देशात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात महाराष्ट्र मोठे केंद्र बनले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादनात राज्याचा वाटा 18 टक्के आहे. सध्या या क्षेत्रातील कंपन्यांची राज्यात 16,775 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव (Investment Proposal) सादर झाले आहेत.इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज योजना, इलेक्ट्रॉनिक आणि सेमिकंडक्टर निर्माणाला प्रोत्साहन देण्याची योजना आणि उत्पादकांना पीएलआय योजनेचा लाभ दिला जात आहे.
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 80 कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून 16,775 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत.या कंपन्यांसाठी विभिन्न प्रोत्साहन योजनांअंतर्गत 1800 कोटी रुपयांचे प्रोत्साहन स्वीकृत केले गेले आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याची घोषणा यापुर्वीच करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादनात आत्मनिर्भर पाऊल टाकल्याचा दावा चंद्रशेखर यांनी केला. मंत्र्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, यातील 40 युनिट पुण्यात असून त्यात जवळपास 8,608 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. याशिवाय जवळपास 2,279.2 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव असलेल्या 6 कंपन्या औरंगाबादेत, नाशिकमध्ये 1,305 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावाच्या 6, अहमदनगरमध्ये 1,153.76 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 आणि मुंबईत 2,362.2 कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावाच्या 4 कंपन्या येणार आहेत.
मंत्री चंद्रशेखर लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हणाले की, ” महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे महत्त्वाचे स्थान बनले आहे.”चंद्रशेखर यांनी हे मान्य केले की, पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगावर वाईट परिणाम झाला. सेमिकंडक्टर आणि मायक्रोचिपच्या टंचाईमुळे ऑटो आणि विभिन्न इलेक्ट्रॉनिक उद्योगांना प्रभावित केले आहे. यामुळे उत्पादनात 5 ते 7 टक्के घट झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज योजना, इलेक्ट्रॉनिक आणि सेमिकंडक्टर निर्माणाला प्रोत्साहन देण्याची योजना आणि उत्पादकांना पीएलआय योजनेचा लाभ दिला जात आहे.
येत्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याची घोषणा ही करण्यात आली आहे. याद्वारे देश-विदेशातील गुंतवणूक राज्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आदर्शवत फार्मा पार्कची ही घोषणा करण्यात आली आहे.