बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचा तिचा एक रोमॅंटिक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये या फोटोची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी देखील सुकेश आणि जॅकलिनचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनची देखील चौकशी केली होती, या चौकशीनंतर जॅकलिन सर्वप्रमथ चर्चेत आली.
इडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जॅकलिनने म्हटले होते की, मी 2017 पासून सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात होते. ज्यावेळी आपली त्याच्याशी ओळख झाली, तेव्हा त्याने आपण दिवंगत नेत्या जयललिता यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे आपल्याला सांगितले. मी फेब्रुवारी 2017 पासून सुकेशशी बोलत आहे. ऑगस्ट 2021 मध्ये त्याला अटक करण्यात आली, त्यानंतर मी त्याला कधीही भेटले नाही. याचदरम्यान त्याने आपण सन टीव्हीचा मालक असल्याचा दावा देखील केल्याचे जॅकलिनने म्हटले होते. दरम्यान जॅकलिनच्या बहिणीला देखील सुकेश याने 15 लाख रुपये दिल्याची माहिती इडीच्या चौकशीतून समोर आली होती. जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर हे रिलेशनशिपमध्ये असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. जॅकलीन व्यतिरिक्त नोरा फतेहीलाही चंद्रशेखर याने अनेक महागडे गिफ्ट दिल्याची माहिती समोर येत आहे.
जॅकलीन आणि नोरा व्यतिरिक्त, सुकेश चंद्रशेखर हा श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी आणि हरमन बावेजा यांच्या देखील संपर्कात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इडीच्या चौकशीमध्ये आपण हरमन बावेजा आणि कार्तिक आर्यन सोबत एका चित्रपट निर्मितीची योजना आखत असल्याचा दावा त्याने केला आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या सुटकेसाठी देखील सुकेश चंद्रशेखर यांनी तिच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त समोर येत आहे.