भविष्य सांगणाऱ्या अ‍ॅप मधून ते झाले कोट्याधीश

आपला आजचा दिवस कसा असेल? हा महिना कसा जाईल? आपल्या आयुष्यात काय घटना घडणार आहेत. आपण आयुष्यात किती संपत्ती कमवणार आहोत, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी आपण ज्योतिष शास्त्रचा अभ्यास करतो, किंवा एखाद्या भविष्य सांगणाऱ्याचा सल्ला घेतो. अनेक जण ज्योतिषाने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करतात. यातून एक स्टार्ट अपची कल्पना पुढे आली, आणि त्यानंतर त्या स्टार्ट अपने त्या व्यक्तीला कोट्याधीश बनवले.

ही गोष्ट आहे अ‍ॅस्ट्रोटॉकचे संस्थापक पुनीत गुप्ता यांची. अ‍ॅस्ट्रोटॉक हे व्यक्तीचे भविष्य सांगणारे अ‍ॅप आहे. भविष्य कथनावर आधारीत या अ‍ॅपची थीम आहे. विशेष म्हणजे जेव्हा हे अ‍ॅप सुरू केले तेव्हा भविष्यावर किंचितही विश्वास नसणारे पुनित या अ‍ॅपच्या माध्यमातून आज कोट्यवधी रुपये कमवत आहेत. त्याचा हा प्रवास अतिशय रंजक असाच आहे.

नोकरीचा राजीनामा देऊन सुरू केला स्टार्ट अप
पुनीत गुप्ता हे एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करत होते. मात्र त्यांचे फार काळ नोकरीत मन लागले नाही. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्व:ताचे स्टार्ट अप सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना अपक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी आपला उद्योग बंद करून पुन्हा एकदा नोकरी करायला सुरुवात केली. मात्र ते सतत नाराज राहात असत, एक दिवस त्यांच्या एका ऑफीसमधील सहकाऱ्याने त्यांना त्यांच्या नाराजीचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी त्याला आपली समस्या सांगितली व पुन्हा एकदा उद्योग सुरू करण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. पुनीत यांचे हे मित्र ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी पुनीत यांना ज्योतिषाची मदत घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांनी ते टाळले.

दरम्यान त्यांच्या या मित्राचा हट्ट कायम राहिल्याने ते एक दिवस या सर्व गोष्टींना तयार झाले. आणि त्यांनी त्यांच्याकडेच सल्ला विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमच्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे. तुमच्या ग्रहस्थितीनुसार नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसाय सुरू करू शकता. 2017 पर्यंत तुमच्यासाठी काळ अनुकूल असेल, मात्र त्यानंतर तुम्हाला काही समस्यांचा सामना कारावा लागू शकतो. गुप्ता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून,नोकरीचा राजीनामा दिला. पुन्हा एकदा त्यांनी स्टार्टअप सुरू केले. 2017 पर्यंत त्यांचा व्यवसाय चांगला देखील चालला. मात्र त्यानंतर झालेल्या फसवणुकीमुळे त्यांचा व्यवसाय डबघाईला आहे. मग त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या त्याच मित्राचा सल्ला घेतला.

या मित्राचा सल्ला घेताना त्यांच्या डोक्यात जोतिष शास्त्रासाठी देखील एखादे स्वतंत्र अ‍ॅप असावे असा विचार आला आणि त्यातूनच पुढे अ‍ॅस्ट्रोटॉक नावाच्या अ‍ॅपचा जन्म झाला. आज लाखो लोक हे अ‍ॅप वापरत असून, याच्या माध्यमातून गुप्ता हे कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. याबाबत बोलताना पुनीत गुप्ता यांनी सांगितले की, अ‍ॅप लॉंच केल्यापासून या अ‍ॅपला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही खूप लांबचा पल्ला गाठला आहे. सध्या या अ‍ॅपच्या माध्यमातून आम्हाला दिवसाकाठी 32 लाखांचे उत्पन्न मिळते. माझ्याकडे एका शिफ्टसाठी 1400 म्हणजेच तीन शिफ्ट मिळून एकूण 3600 जोतिष शास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक आहेत. जे 24 तास आमच्या ग्राहकांना मार्गदर्शन करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.