कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (omicron) मुंबईत शिरकाव झाला आहे. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 10 वर पोहचला आहे. यामुळे प्रशासन आणि यंत्रणा जागे झाले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
राज्यात ८ रुग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज रात्री टास्क फोर्सबरोबर बैठक बोलावलीय. सध्या ही बैठक सुरु आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी नियमावली लागू करायची का याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. दरम्यान सध्या जरी कडक निर्बंधाबाबत शक्यता नसली तरी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हंटलंय.
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.