देशातील सार्वजनिक बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या विरोधात या संपाची हाक देण्यात आली आहे. बँका 16 आणि 17 डिसेंबरला बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संपाची हाक दिली आहे. बँका नफ्यात असतानाही बँकाचे खासगीकरण का, असा सवाल युनायटेड फोरम युनिनने उपस्थित केला आहे.
या संपामुळे दोन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. सरकारने आता त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. या विरोध करण्यासाठी हा संप असल्याचे सांगण्यात आले आहे.
फायद्यात असताना सार्वजनिक बँकांचे खासगीकरण कशासाठी, असा सवाल उपस्थित करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) संपाची घोषणा केली आहे. UFBUमध्ये बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश आहे. सरकारने बँकिंग कायदा विधेयक, 2021 संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात सादर करण्यासाठी आणि त्याला मंजूर करण्यासाठी कामकाजात सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे बँक कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, संपाव्यतिरिक्त डिसेंबर महिन्यात 10 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाहीत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवारचा समावेश आहे.