कर्नाटकमध्ये ओमिक्राॕनचे दोन रुग्ण सापडले,महाराष्ट्राचे टेन्शन वाढले,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती.
जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव
गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
च्युईंग गम करोना संसर्गापासून
लोकांचा बचाव करु शकते
प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आलेलं एक च्युईंग गम आता करोना संसर्गापासून लोकांचा बचाव करु शकतं असा दावा वैज्ञानिकांनी केलाय. हे च्युईंग गम तोंडामधील करोना पार्टीकल्सचा ट्रॅप करतं असं सांगण्यात आलं आहे. तोंडामधील ९५ टक्के करोना पार्टीकल्स या च्युईंग गमच्या माध्यमाने ट्रॅप होऊ शकतात आणि त्या माध्यमातून करोनाचा फैलाव रोखता येतो असं सांगण्यात आलं आहे.
ते उद्योगधंदे पळवायला आले हा
अर्थ कसा काय निघतो? : अजित पवार
महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योग हे पळवले जात आहेत अशी टीका करण्यात आली, असं म्हणत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी, “मला एक कळत नाही, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते उद्योगधंदे पळवायला आले हा अर्थ कसा काय निघतो?” असा प्रतिप्रश्न केला. उद्योगपतींना जिथं जिथं कामगार, जागा, पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा मिळतात तिथं ते जाण्याचा प्रयत्न करतात. काहीजण रेड कार्पेट टाकतात,” असं अजित पवार म्हणाले.
मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावा
अशी त्यांची पात्रताच नाही : थोरात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, “नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही”. या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे,” असं थोरात म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने पाठवलेले
व्हेंटिलेटर्सपैकी 60 टक्के व्हेंटिलेटर्स खराब
करोना काळात केंद्र सरकारकडून मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवण्यात आले. करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची गरज असल्यामुळे त्याचा पुरवठा पीएम केअर फंडामधून करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सपैकी तब्बल ६० टक्के व्हेंटिलेटर्स खराब असल्याचं खासदार विनायक राऊत लोकसभेत म्हणाले. “केंद्रानं दिलेले ६० टक्के व्हेंटिलेटर्स खराब होते. आजही हे व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत. हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी टेक्निशियन्स देखील मिळत नव्हते”, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
आर्यन खान प्रकरणातील
किरण गोसावीला अटक
आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात गोसावीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यापूर्वी गोसावीला एका फसवणुकीच्याच प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. गेल्या महिन्यात त्याला पुण्यातील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबाबत
२४ तासांचा अल्टिमेटम
सातत्याने प्रदूषणाची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालल्यामुळे आता थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला फटकारलं आहे. दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात उपाय शोधला नाही, तर आम्ही पावलं उचलू, असा दमच न्यायालयानं भरला आहे.
मुलाला चावा घेतल्याने भटक्या
कुत्र्याचे पाय कापले
एका भटक्या कुत्र्याने मुलाला चावा घेतल्यानंतर एका व्यक्तीने कुत्र्यांची अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिमरियातल गावात ही घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली होती. या क्रूर हत्येचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एका प्राणी कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे देहाट पोलीस स्टेशनचे प्रभारी आनंद कुमार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने
पीएचडीची डिग्री परत मागितली
उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठात घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्याने विद्यापीठाने पीएचडीची डिग्री परत मागितल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला आहे. दानिश रहीम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या विद्यार्थ्याने केली आहे. दानिशला अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने पीएचडीची डिग्री दिली होती. आता ही डिग्री परत मागितली जात आहे.
मिर्झापूर २ मधील अभिनेता
ब्रम्हा मिश्राचे निधन
‘मिर्झापूर २’ या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ललित ही भूमिका साकारणार अभिनेता ब्रम्हा मिश्राचे निधन झाले आहे. अभिनेता दिव्येंदू शर्माने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पण ब्रह्माच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्रम्हा मिश्राच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांना धक्काच बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत.
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा
दौरा पुढे ढकलण्यात आला
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सध्या भारतीय क्रिकेट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. करोनाच्या नव्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
SD social media
9850 60 3590