राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राजकारण चांगलंच पेटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली होती. अपक्ष आमदारांच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री यांनी ही ऑफर दिल्याची माहिती दिली होती. संभाजीराजे यांना विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदतही देण्यात आली होती.
पण संभाजीराजे यांनी शिवसेनेनं दिलेली ऑफर नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या संभाजीराजे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार नसल्याचं समजतंय.
उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ इथं शिवबंधन बांधण्यासाठी येण्याचा निरोप दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. पण शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजे यांनी नाकारली आहे.
शिवसेना शिष्टमंडळाने आज संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतल्या ट्रायडंट हाँटेलमध्ये भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप शिष्टमंडळाने संभाजीराजे छत्रपती यांना दिला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही फोनवरून संभाजीराजे छत्रपती यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या भेटीत शिवसेना शिष्टमंडळाने उद्या म्हणजे सोमवारी दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांना दिलं होतं.