मुंबई हल्ल्याचा कट आखणाऱ्या डेव्हीड कोलमन हेडली याचा बालपणीचा मित्र आणि मूळ पाकिस्तानी असलेला कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याला भारताच्या ताब्यात देण्यास हरकत नसल्याचे बाय डेन प्रशासनाने लॉस एंजिल्स येथील न्यायालयात सांगितले. त्यामुळे लवकरच हा आरोपी भारतात येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील लॉस एंजलिस न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन शूलजियान यांनी आता राणा याला भारताच्या ताब्यात देण्याच्या या प्रकरणाची सुनावणी २२ एप्रिल रोजी ठेवली आहे. तहव्वुर राणा याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने यापूर्वीच केली आहे.
सहायक सरकारी वकील जॉन जे लुलेजियान यांनी संघराज्य न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, राणा (वय ५९) हा त्याला २००८ मधील दहशतवादी हल्ल्यातील प्रकरणात सर्व अटींचा विचार करता भारताच्या ताब्यात देण्यास पात्र ठरतो. त्याला या आधी फरारी घोषित करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी रोजी राणा याच्या वकिलांनी त्याला भारताच्या ताब्यात देण्यास विरोध केला होता. २२ एप्रिल २०२१ रोजी आता या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यानंतर राणा याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे लुलेजियान यांनी सोमवारी न्यायालयास सादर केलेल्या ६१ पानांच्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.