आज दि.२९ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

उच्च शिक्षण व्यवस्थेला एकाच
नियामकाच्या कक्षेत आणण्याची तयारी

देशात वेगवेगळ्या नियामकांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला सध्या भारतीय उच्च शिक्षण आयोग (एचईसीआय) सारख्या एकाच नियामकाच्या कक्षेत आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा आराखडा तयार केला आहे. आता याला फक्त संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशनात संसदेत हे विधेयक केंद्राकडून पटलावर ठेवण्याची शक्यता आहे.

शाळा पुन्हा सुरू कराव्या, लसीकरण
महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते

गेल्या दीड वर्षात कोरोना साथीच्या आजारामुळे केवळ उद्योग, व्यवसायच नव्हे, तर शालेय मुलांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याकरिता शाळा पुन्हा सुरू कराव्या लागतील, यात लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, तसेच लसीकरण हा त्यासाठी एकमेव मार्ग आहे, असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध होणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असेल.

गणेशोत्सवासंदर्भात
नियमावली जाहीर

संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरगुती विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक मंडळातील मूर्ती ४ फुटांची, घरगुती मूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा आहे.

महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन प्रजातीचा
शोध, एकाला शहीद ओंबळे यांचं नाव

महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. यापैकी एका प्रजातीला शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचं नाव देण्यात आलं आहे. या प्रजातींच्या संशोधकांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या प्रजातीचं नाव Icius Tukarami असं ठेवण्यात आलं आहे.

दुकानांच्या वेळेबाबत
व्यापाऱ्यांमध्ये असंतोष

राज्यात दुकाने आणि अन्य सेवांच्या वेळेत बदल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निर्बंधांचा खेळ बंद करावा, अशी मागणी करीत पुणे, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ अशी झाली आहे. वेळांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ही वेळ गैरसोयीची असल्याचे म्हणणे आहे.

कोरोना प्रतिबंधित लस
गर्भवतींसाठी पूर्णपणे सुरक्षित

कोरोना विषाणूचा सर्व लोकांना समान धोका आहे. कोणालाही विषाणूची बाधा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. गर्भवतींच्या मनात लसीकरणाबाबत अनेक शंका कुशंका आहेत. गर्भवतींनी लस घ्यावी, असे केंद्र सरकार आणि आयसीएमआरकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. गर्भवतींसाठी कोरोना प्रतिबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असून, संसर्गाचा धोका वाढत नाही, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटने
महाराष्ट्राची चिंता वाढवली

कोरोनाचा नवा व्हेरियंट (अवतार) डेल्टा प्लस भारतात वेगाने पसरतोय. बघता बघता डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण भारतात झाले असून त्यातील ३४ तर महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. विशेष म्हणजे डेल्टा प्लसच्याच भितीने महाराष्ट्र सरकारने अचानक पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असले व्यवहार आता दुपारी ४ पर्यंतच मर्यादित होण्यामागे डेल्टा प्लसचेच कारण आहे.

डेल्टा व्हेरिएंटने इस्रायल, ऑस्ट्रेलिया
फिजी या देशांची दारे ठोठावली

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी मास्क घालण्याची अनिवार्यता हटविणे अनेक देशांना महागात पडले आहे. खूपच वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांची दारे ठोठावली आहेत. डेल्टा व्हेरिएंट या देशांमध्ये आता वेगाने पसरत आहे. त्यामुळे तिन्ही देशांमध्ये आता विनाकारण घराबाहेर फिरण्यावर निर्बंध लावण्यासह कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले. आहेत.

योजनांच्या प्रभावी देखरेखीसाठी
डॅशबोर्ड तयार करण्याचे आवाहन

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमईसाठी मानांकन प्रणाली आणि एमएसएमई योजनांच्या प्रभावी देखरेखीसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे आवाहन केले आहे. चेंबर ऑफ इंडियन एमएसएमई, सीआयएमएसएमई द्वारा आयोजित वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले की चांगली उलाढाल आणि जीएसटी संबंधित बाबींची उत्तम नोंद असलेल्या एमएसएमईंना मानांकन देण्यासाठी सोपी व पारदर्शक पद्धत विकसित केली पाहिजे, वित्तपुरवठा मिळण्यासाठी त्या सक्षम बनतील.

भाजपमध्ये सर्व हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ?

भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक सवाल केला आहे. “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपावर केली.

सेंट्रल व्हिस्टासंदर्भातील
याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ३१ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टासंदर्भातील निर्णयावरील अर्ज फेटाळला आहे. करोनाच्या कालावधीमध्ये सेंट्रल व्हिस्टाचं बांधकाम थांबवण्यात यावं अशी मागणी करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली. ती याचिका सुद्धा फेटाळण्यात आली आहे.

बनावट लसीकरण प्रकरणातील
डॉ. मनीष त्रिपाठी शरण

मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अखेर मंगळवारी कांदिवली पोलिसांसमोर शरण आला आहे. या अगोदर त्याने अटकेच्या भीतीने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती.

पायी वारीच्या परवानगीसाठी
सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना पायी वारी नाकारण्यात आली आहे.कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना पायी वारी नाकारण्यात आली आहे. 250 पालख्यांना पायी वारीसाठी परवानगी देण्यात यावी यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या
नोकऱ्या धोक्यात

टीईटी अर्थात किमान शैक्षणिक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील 89 याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं निकाली काढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. यातील 200 हून अधिक शिक्षकांना दिलासा मिळावा, यासाठी आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. अपात्र शिक्षकांना मुदतवाढ न देता त्यांना बरखास्त करून पात्र बेरोजगार युवकांना नोकरी द्यावी, अशी मागणी करीत डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन ही संघटना अपात्र शिक्षकांच्या विरोधात बाजू मांडणार आहे. सरकारनं मात्र याबाबत वेट अॕण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. चार आठवड्यांनंतर निर्णय घेणार आहे.

भारताचा चुकीचा नकाशा
ट्विटरने हटविला

ट्विटरने आपल्या वेबसाईटवरून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळ दाखवल्यानंतर भारताचा चुकीचा नकाशा हटविला आहे. ‘Tweep Life’वर दाखवलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळ दाखवल्यानंतर ट्विटरविरूद्ध सक्त कारावई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पण आता ट्विटरने चुकीचा नकाशा हटविला असल्याचं कळत आहे. भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.