महा टीईटी परीक्षेत एका विद्यार्थिनीनं ब्ल्यूटुथचा वापर करत परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे. इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. यामुळं परीक्षा कक्षात प्रवेश करताना यासंदर्भातील तपासणी करण्यात आली नव्हती का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आली होती. गोंदियामधील संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षिकेने चक्क ब्लू टूथ च्या माध्यमातून पेपर सोडविताना एका परीक्षार्थीने पकडले.
टीईटीचा पेपर संत तुकाराम शाळेमध्ये चालू असताना रूमनंबर 5 मध्ये एका मुलीने ब्ल्यूटुथ लावून पेपर सोडवत असल्याची तक्रार तिच्या मागच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थिनीनं केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
टीईटी परीक्षा दरम्यान विद्यार्थिनीनं ब्ल्यूटूथचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानंतर बराच गोंधळ उडाल्यानं पोलिसांना बोलावण्यात आले. प्रत्येक परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्याची परवानगी नसते. मग संबंधित विद्यार्थिनीनं जवळ ब्लूटूथ कसं आलं? परीक्षा कक्षात प्रवेश करताना तपासणी झाली नाही का? तपासणी झाली होती तर ब्ल्यूटूथ का दिसलं नाही, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
टीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणजे भावी शिक्षक असतात ज्यांना उद्याचा देश घडवायचा असतो. जे शिकवणारे आहेत त्यांनी जर असे प्रकार केले तर काय देशाचे भविष्य घडणार असं प्रश्नचिन्ह देखील यामुळं निर्माण होते. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन जबाब नोंदवण्यात आले असून या प्रकरणात पुढं काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.