जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. याची सुरुवात बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान झालीय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा आम्ही आदर करतो आम्ही कुठल्या प्रकारे यांच्याशी शाब्दिक चकमक न केल्याचा खुलासा शिवसेनेने केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांना शिवसेनेनं देखील निवेदन दिले होते.
बोदवड येथील प्रचारादरम्यानचा वाद शांत होत नाही तोवर मुक्ताईनगरात पुन्हा शुक्रवारच्या मध्यरात्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक व मुक्ताईनगर चे शिवसेनेचे आमदार यांचे कट्टर समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी उडी घेतली. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबाबत आमदारांना चोप देण्याची भाषा वापरली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी चक्क जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाच याबाबत खडसे परिवाराकडून मला जीवास धोका असल्याची तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिल्यानं चांगलीच खडाजंगी निर्माण झाली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले असून यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत, असा आरोप केला. एकनाथ खडसे यांच्या लोकांचे दोन नंबरचे धंदे असल्याचा आरोप पाटील यांनी केला. माझा दोन नंमबरच्या धंद्याशी रिलेशन क्लीअर करून घ्यावे ते म्हणतील ती शिक्षा भोगेलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला जर महिला असुरक्षित नाहीत असं वाटत असेल तर त्यांच्या वडिलांन समोर एका कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या महिलेला अश्लील बोलले जाते ते चालते का? असा सवाल पाटील यांनी केलाय. ही कुठली संस्कृती मला चोप देण्याची भाषा ते करतात एकेरी भाषेत माझं नाव घेत मला बदनाम करण्याचा षड्यंत्र त्यांच्याकडून सुरू आहे, असं पाटील म्हणाले. अशा प्रकारे रोहिणी खडसे ,एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
माता जिजाऊंच्या आम्ही लेकी आहोत असे असताना एखाद्या महिलेच्या अंगावर जर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. तर, महिलांवर कोणी अत्याचार करत असतील तर मी त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहणी खडसे म्हणाल्या आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी वेळीच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना रोखले नाही तर आम्ही महिलांच्या अत्याचाराबाबत चोप दिल्याशिवाय राहणार नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनेचा विपर्यास न करता ते गांभीर्यानं घ्यावे. कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजून सांगावे एवढीच त्यांना विनंती करते, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
चंद्रकांत पाटील आणि रोहणी खडसे यांच्यातील वादानंतर एकनाथ खडसे यांनी एका जुन्या वायरल ऑडिओ क्लिप बाबत प्रश्न उपस्थित केला. आमदारांच्या ड्रायव्हरचे एका महिलेशी अश्लील संभाषण ऑडिओ क्लिप मध्ये असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. ”मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. आम्ही याबाबत तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते निरर्थक आरोप करत असल्याचे प्रतिपादन एकनाथ खडसे यांनी केले. तर, आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नसून कोण गुन्हेगारी वृत्तीचा आहे हे जनतेला माहिती आहे…!” अशा शब्दांमध्ये खडसे यांनी टोलेबाजी केली.