ओमिक्रॉनच्या धास्तीने जगाबरोबर देशाची आणि राज्याची चिंता वाढवली आहे, त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी मजबूत करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा भर आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यानंतर फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू होता, तशी मागणी आदित्य ठाकरे यांनीही पत्र लिहून केली होती. मोदींनी देशाला संबोधीत करत असताना याबाबत घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लवकरच नेजल आणि डीएनए व्हॅक्सीन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. नेजल व्हॅक्सीन म्हणजे नाकावाटे लस घेता येईल. कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती करणारी भारत बायोटेक नाकावाटे दिल्या जाणाऱ्या नेजल व्हॅक्सीनची निर्मिती करत आहे. अलीकडेच त्यांनी डीसीजीआयकडे फेज तीनच्या स्टडीसाठी परवानगी मागितली आहे. बुस्टर डोस म्हणून नेजल व्हॅक्सीन देण्याची त्यांची योजना आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 16 नोव्हेंबरला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल आणि कोविड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं मोदींनी यावेळी म्हटलं. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणाले.