आज दि.२२ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अभिनंदन वर्धमान यांचा
‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मान

भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आलीय. २०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात डॉगफाइट झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ १६ फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.

अनिल परब यांनी एसटी
कर्मचाऱ्यांशी बोलावं : पडळकर

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. “अनिल परब रोज तेचतेच शिळं बोलत आहेत, त्यांच्याकडे नवीन सांगायला काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं,” अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का? असा सवालही केलाय.

परमबीर सिंह यांना
पोलिसांकडून धोका

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित परमबीर सिंह भारतातच असल्याचं समोर आलंय. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला माहिती दिलीय. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय.

शेअर बाजारात मोठी घसरण

जागतिक बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराची सुरूवात मोठ्या घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीतही मोठी घसरण झाली आहे. बाजाराच्या सुरूवातीच्या तासाभरातच सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला असून ५९२०० त्या आसपास पोहोचला. निफ्टीने १७,७०० चा आकडा गाठला.
यात रिलायन्स इंडस्ट्रीज ३.२% टक्क्यांनी घसरलं असून त्याखालोखाल बजाज फायनान्स, कोटक बँक आणि मारुती सुझुकी इंडिया हे आहेत. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ होत सर्वोत्तम स्थानावर आहेत, त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, प़ॉवर ग्रीड आणि इंडसइंड बँक आहेत.

आर्यन खानच्या अडचणीत
वाढ होण्याची शक्यता

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) उचलत असलेल्या पावलामुळे जामिनावर बाहेर असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहे. एनसीबी अधिकारी आर्यन खानच्या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे की नाही यावर विचार करत आहेत, असे एनसीबीतर्फे सांगण्यात आले आहे. सध्या एनसीबी मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाची तपासणी करून कायदेशीर मत घेत आहे.

प्रत्येक महिलेला महिन्याला
१,००० रुपये देऊ : अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.

जिल्हा निवडणूक – देसले,
कदमबांडे विजयी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील निकाल हाती आले आहेत. धुळे, नंदुरबार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान पार पडले होते. आता नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले, राजवर्धन कदमबांडे हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलमधून चंद्रकांत रघुवंशी, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील व संदीप वळवी हे विजयी झाले आहेत.

अमेरिकेत भरधाव गाडी ख्रिसमस
परेडमध्ये घुसल्यानं ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात शाळकरी मुलं आणि सामान्य नागरिकांचा समावेश असलेल्या एका ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसल्यानं ५ जणांचा मृत्यू झालाय, तर जवळपास ४० लोक जखमी झालेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. यात एक लाल रंगाची एसयूव्ही कार अचानक गर्दीत येऊन अनेकांना चिरडत जाताना दिसत आहे. त्या गाडीमागे लगेच पोलिसांची गाडी पाठलाग करतानाही पाहायला मिळत आहे. ही घटना वौकेशा (Waukesha) या शहरात सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी घडली.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.