एका सात वर्षांच्या मुला ने सुरू केलेली बँक ही जगभरातील एक यशोगाथा म्हणून नावाजली जात आहे. साधारणतः सातव्या वर्षी मुलं काय करत असतात, याचं उत्तर शोधलं तर ठराविक गोष्टी दिसतात. त्यांनी अक्षरओळख पूर्ण झालेली असते, आकड्यांचं प्राथमिक ज्ञान आलेलं असतं आणि ते मोठी वाक्यं बनवायला आणि गुणाकार आणि भागाकाराची गणितं शिकायला सुरुवात करत असतात. मात्र या वयात एका मुलानं चक्क स्वतःची बँक तयार केली आणि ती यशस्वीपणे चालवूनही दाखवली.
अशी सुचली कल्पना
पेरू देशात राहणाऱ्या जो नावाच्या विद्यार्थ्याला पैसे आणि त्याचे व्यवहार याबाबत कमालीची उत्सुकता होती. आपले मित्र विनाकारण आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतात, अशी त्याची भावना होती. आपल्या मित्रांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याने एक बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मित्रांचे पैसे त्या बँकेत ठेवायचे आणि अनावश्यक खर्चाला आळा घालायचा, असा तो प्लॅन होता.
शिक्षकांनी दिला नकार
आपली ही कल्पना त्याने शिक्षकांना सांगितली. मात्र जोचं वय पाहून शिक्षकांनी त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. या वयात बँक वगैरे सुरु करण्याचा विचार वेडेपणाचा असल्याचं सांगत त्याच्या कल्पनेला धुडकावून लावलं. त्यानंतर काही दिवस त्याने या संकल्पनेवर विचार करत त्यात सुधारणा केली. यावेळी मात्र कुणालाही न विचारता थेट त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.
अशी चालते बँक
पर्यावरण रक्षण आणि पैसे कमावणे अशा दोन्ही पातळ्यांवर या बँकेचं काम चालतं. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या टाकाऊ वस्तू, कचरा, ई वेस्ट अशा वस्तू मुलं गोळा करतात आणि त्या रिसायकल करणाऱ्या कंपनीला विकतात. त्यातून मिळणारे पैसे हे त्या त्या मुलाच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र हे पैसे लगेच काढता येत नाहीत. वर्षाचं बचतीचं टार्गेट पूर्ण झाल्यावरच आपल्या खात्यातून मुलांना पैसे काढता येतात. या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय तर लागतेच शिवाय पर्यावरण रक्षणाचंही काम होतं.
जो याला अनेक पुरस्कार
वयाच्या सातव्या वर्ष जो यानं ही संकल्पना सुरू केली. आता तो 13 वर्षांचा आहे. या कामगिरीसाठी त्याला जगभरातील अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.