अहमदनगर जिल्हा रुग्णालयात
भीषण आग, १० जणांचा मृत्यू
अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ रुग्ण उपचार घेत होते.
मुख्यमंत्र्यांनी दिले
कठोर कारवाईचे आदेश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
माजी मंत्री अनिल देशमुख यांना
चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली आहे. तसेच त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान पत्रकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला नव्हता. सुनावणी आधीच न्यायालयानं पत्रकारांनी मुख्य प्रवेशाच्या बाहेरच थांबावे असे निर्देश दिले होते. ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अनिल देशमुख यांना ९ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं ईडीच्या आणि अनिल देशमुख या दोघांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर निर्णय दिला.
ऋषिकेश देशमुखने अटकेच्या
भीतीने केला जामिनासाठी अर्ज दाखल
आरोपी नसतानाही माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.
खंडणी प्रकरणातील सचिन वाझेला
13 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात आता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेकडून जेव्हा १० दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा न्यायालयाने सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती.
गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) कार्यरत असताना सचिन वाझेने तपास सुरू केलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे.
मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट
होणार वृत्तामध्ये तथ्य नाही
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही स्थलांतरीत होणार नाहीत. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं नुकत्याच खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू हा तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे हा आहे”, असं रिलान्सय इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
वानखेडे यांना पाठवण्यात आलेले नाही,
एनसीबीच्या पत्रात उल्लेख : क्रांती रेडेकर
क्रांती रेडेकरने ट्विटरवरुन एनसीबीने जारी केलेलं प्रसिद्धीपत्रक शेअर केलं आहे. “अफवांना बळी पडू नका. हे पाहा एनसीबीने जारी केलेलं अधिकृत पत्रक,” असं म्हणत या पत्रकाचा फोटो शेअर केलाय. या पत्रकामधील काही ओळखी अधोरेखित करण्यात आल्यात. कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सध्याच्या जबाबदारीवरुन (प्रकरणावरुन) हटवण्यात आलेलं नाही. ते अधिकारी ऑप्रेशन ब्रँचला तपासात सहकार्य करतील, जोपर्यंत पुढील काही आदेश दिला जात नाही,” असं या पत्रकात नमूद करण्यात आल्याचं क्रांतीने दर्शवलं आहे.
ड्रग्ज घेणाऱ्या संदर्भातील कायद्यात
बदल केला जाणार : रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असं मत मांडलं आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे अशा पद्धतीने विधान करीत ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील आठवले यांनी केला आहे.
देशाच्या विकासाची गाडी मोदींनी
रिव्हर्स गिअर मध्ये टाकली : राहुल गांधी
सिलिंडरचे पुन्हा भाव वाढ झाल्याने राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “विकासाच्या आश्वासनांपासून कित्येक मैल दूर असलेल्या लाखो परिवारांवर पुन्हा चूल फुंकण्याची वेळ ओढवली आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिवर्स गियरमध्ये आहे आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल आहेत”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
SD social media
9850 60 3590