उल्हासनगरमध्ये दिवाळीपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मिठाईसाठी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 900 किलोचं साहित्य एफडीएनं जप्त केलं आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील शांतीनगर भागात गुरुदेव इंटरप्रायझेस हे मिठाई साहित्याच्या डिस्ट्रिब्युटरचं दुकान आहे. या दुकानात अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकली. अधिकाऱ्यांनी दुकानातील साहित्याची तपासणी केली असता इथे मिठाईच्या साहित्याचा मोठा साठा होता. यामध्ये काजूकतलीचे बॉक्स, तसंच मावा भरलेल्या गोळ्या होत्या. यापैकी काही साहित्यावर लेबल, उत्पादकांची माहिती, एक्सपायरी डेट अशी माहिती होती.
तर जवळपास 900 किलो साहित्यावर अशी कोणतीही माहिती छापण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वच साहित्याचे नमुने घेत माहिती नमूद नसलेलं 900 किलो साहित्य एफडीएने जप्त केलं.
या गोण्यांवर साहित्य कोणतं आहे? त्याची पॅकिंग डेट, एक्सपायरी डेट अशी कोणतीही माहिती नव्हती. हा सगळा माल गुजरातमधून आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे. या कारवाईमुळे दिवाळीच्या तोंडावर भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.