कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाची यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध लावण्यात आले होते. तर आता मात्र तब्बल दोन दोन वर्षानंतर श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर यंदाची चैत्र पौर्णिमा यात्रा कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार आहे. शासनाकडून यात्रेवरचं निर्बंध हटवण्यात आल्यामुळे यंदा जोतिबा डोंगरावर चांगभलच्या गजरात भाविक गुलाल उधळणार आहेत.
जोतिबाची यात्रेला दोन वर्षांचा खंड पडला होता, त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन यात्रेच्या तयारीबाबतचा सर्व विभागाकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांना यात्रेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रयत्नशील राहा अशा सूचना करण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी जोतिबाच्या डोंगरावरच्या यात्रेविषयी स्पष्ट निर्णय घेतल्यामुळे भाविकांच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे. शासनाने यात्रेबाबतचा महत्वाचा निर्णय जाहीर केल्यामुळे यंदा जोतिबाच्या डोंगरावर चांगभलचा गजणार जोरात घुमणार आहे, आणि भाविकांचीही मोठी गर्दी होणार आहे.
जगावर कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर अनेक गोष्टींवर, कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले होते, त्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांवर कडक निर्बंध लावण्यात आले होते, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जोतिबाच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट बघत होते. शासनाने जाहीर कार्यक्रमांना, यात्रा, जत्रांवर कडक निर्बंध लावण्यात आल्याने यंदाही जोतिबाची यात्रा होणार की नाही याबाबतच्या संभ्रमात जोतिबाचे भाविक होते. मात्र आता पालकमंत्र्यांनीच जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन यावर्षी चैत्र यात्रेवरील सर्व निर्बंध हटवल्याचे सांगितले.