उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा बँक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक सध्या चर्चेत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर राजकारणाचा नवा अंक पाहायला मिळतोय. जळगाव भाजपच्या खासदार रक्षा खडसे व भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले, असा आरोप जिल्हा बँक निवडणूक अर्जावरून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केलाय. निवडणूक प्रक्रियेविरुद्ध बोलण्याऐवजी गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा टोला सतीश पाटील यांनी केलाय.
भाजप खासदार रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांना फसवलंय. दोघींनी जाणीवपूर्वक अर्ज अपूर्ण ठेवल्यानं त्यांचे अर्ज बाद झाले. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवायची असेल त्यामुळे त्यांनी महाजन यांच्या आदेशानं अर्ज दाखल केले असतील, असं सतीश पाटील म्हणाले.
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचा असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने रक्षा खडसे यांनी जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, रक्षा खडसे यांना जिल्हा बँकेत उभारण्याची हिम्मत नव्हती म्हणून जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री सतीश पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिनी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपाचे खंडन केले.