आज दि.२९ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

गुलाब चक्रीवादळाचा तडाखा
४३६ जणांनी प्राण गमावले

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातल्या काही विदर्भ- मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ४३६ मृतांपैकी ६ जणांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. १३६ जण जखमी झालेले आहेत. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव इथं आपत्ती निवारण दल मदतकार्य करत होतं.

आम्ही सरकार म्हणून
शेतकऱ्यांच्या पाठीशी

मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा देणारं आवाहन केलं आहे. “आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

पंजाबमध्ये वीज बिल माफ
53 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच पंजापचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मोठी घोषणा केलीय. पंजाबमधील २ किलोवॅटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबांचं वीजबिल माफ केलं जाणार आहे. हे वीज बिल पंजाब राज्य सरकार भरणार आहे. याचा जवळपास ५३ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सरकारला जवळपास १२०० कोटी रुपयांचं वीज बिल भरावं लागेल. याशिवाय वीज बिल न भरल्यानं तोडण्यात आलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार आहेत.

बारा दहशतवादी संघटनांना
पाकिस्तानमध्ये आश्रय

दहशतवादासंदर्भात अमेरिकन काँग्रेसच्या ताज्या अहवालात भारतावर आरोप -प्रत्यारोप करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. आंततरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या गेलेल्या किमान १२ संघटनांसाठी पाकिस्तान हे सुरक्षित आश्रयस्थान आहे असे अहवालात म्हटले आहे. ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद, भारताला लक्ष्य करणाऱ्या पाच दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

जापानच्या पंतप्रधानपदी
फुमिओ किशिदा यांची वर्णी

जापानचे माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. किशिदा यांची सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकल्यास किशिदा जापानचे पुढचे पंतप्रधान होतील, हे स्पष्ट आहे. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे मुख्य नेते योशिहदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका वर्षानंतर आपलं पद सोडणार आहेत.

रुग्णालयांनी स्पुटनिक
व्हीची मागणी केली रद्द

भारतातील काही रुग्णालयांनी रशियन बनावटीची करोना लस स्पुटनिक व्हीची मागणी रद्द केली आहे. देशात या रशियन लसीची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून लक्षणीयरित्या कमी झाली आहे. स्पुटनिक व्ही कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्याचे आव्हान असल्याचे सांगत रुग्णालयांनी लसीची मागणी रद्द केली आहे. सरकारकडून बहुतांश लोकांना लस मोफत उपलब्ध आहे त्यामुळे या लसींची विक्री होण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याचे काही रुग्णालयांनी म्हटले आहे. किमान तीन प्रमुख रुग्णालयांनी स्पुटनिक व्हीची मागणी रद्द केली आहे.

मुंबईच्या रस्त्यावरील
42 हजारावर खड्डे भरले

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील रस्त्यांबाबत कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई तसेच आयुक्तांना दर आठवड्याला आढावा घेण्याचे आदेश दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “एप्रिलपासून आजपर्यंत ४२ हजाराच्यावर आपण खड्डे भरले आहेत. दरम्यान, भरलेले खड्डे पुन्हा उकरले की नवीन खड्डे झाले ही पाहणी दोन दिवसांपुर्वी केली.

आमचा दसरा कडवट झाला तर
तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

आमचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला. एफआरपी चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्रीपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोतिबाच्या डोंगरावरून आंदोलनाला सुरुवात होईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दसऱ्याला जेजुरी येथे मेळावा घेत आंदोलनाची सांगता होईल. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नियमित तपासणी साठी गेलो
होतो, इंझमाम-उल-हक

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान फलंदाजांपैकी एक इंझमाम-उल-हकला लाहोर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त होते. आता इंझमामने हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. स्वतः सांगितले आहे की त्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. नियमित तपासणीसाठी तो रुग्णालयात गेला होता. इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सगळीकडे पसरले होते.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.