21 कोटी रुपये किमतीच्या सुलतान रेड्याचा हृदयविकाराने मृत्यू

रेड्याच्या जाण्याने सर्वाधिक दु:ख कुणाला झालं असेल, तर ते या रेड्याचे मालक नरेश यांना. कारण, त्याला त्यांनी राजेशाही थाटात वाढवलं, त्याच्या शरीरयष्टीच्या कहाण्या याच बुडाखेडा गावातून जगभर पोहचल्या. सुल्तानने अनेक प्रदर्शनात लाखोंची बक्षीसं पटकावली. आणि या रेड्यामुळेच नरेश यांना सर्वत्र ओळख मिळाली, मात्र आता सुल्तान गेल्याने त्यांना कुटुंबातील एक सदस्यच गेल्याचं दु:ख होत आहे.

सुल्तानचे मालक नरेश यांनी सुल्तानला रोहतकमधून खरेदी केलं होतं. त्यावेळी त्यांनी सुल्तानला पाहून 2 लाख 40 हजार रुपये दिले होते. लहान असल्यापासूनच त्यांनी सुल्तानची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतली. त्याचा गोठा हा कुटुंबासाठी घरच होता. त्यामुळे जेव्हा सुल्तान या जगात नाही आहे, तेव्हा त्यांना ही खुंटीही त्याची आठवण करुन देते.

सुल्तानची किर्ती भारतभर पसरली होती. त्यामुळे ज्या प्राणीप्रदर्शनात सुल्तान जात असे, तिथं त्याला बघण्यासाठी हजारो लोक येत. यातील बऱ्याच लोकांनी त्याला खरेदी करण्याचाही प्रयत्न केला. राजस्थानातल्या पुष्करच्या जत्रेत तर सुल्तानवर 21 कोटींची बोलीही लागली. मात्र, मुलाप्रमाणे वाढवलेल्या सुल्तानला विकण्याची तयारी नरेश यांची नव्हती. त्यामुळेच त्यांनी ती बोली नाकारली.

सुल्तानला नरेश हे नेहमी प्राण्यांच्या प्रदर्शनात घेऊन जायचे. त्याची शरीरयष्टी आणि ठेप पाहिल्यानंतर कुणीही त्याला बक्षीस नाकारु शकत नव्हतं. त्यामुळे नरेश आणि त्यांच्या कुटुंबाला एक वेगळी ओळख मिळाली. हेच नाही तर सुल्तान हा सोशल स्टारही झाला होता. एका म्युझिक अल्बमध्ये सुल्तान दिसला होता. सुल्तान गेल्याचं दु:ख त्यांच्यासाठी मोठं आहे, सुल्तान गेल्यानंतर आणखी एक रेडा घेऊन त्याला मोठं करु, पण सुल्तानची जागा कुणीही घेऊ शकत नाही असं नरेश सांगतात.

ज्या सुल्तानला डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलं, त्या सुल्तानचा मृत्यूसुद्धा नरेश यांच्या नजरेसमोरच झाला. सुल्तानच्या वीर्यापासून शेकडो अस्सल जातीचे रेडे आणि म्हशींची निर्मिती झाली. वीर्याच्या विक्रीतून नरेश यांनी लाखोंची कमाईही केली. एका वर्षात तब्बल 30 हजाराहून अधिक विर्याचे डोस नरेश हे विकत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.