स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास त्याचं नक्की फळ मिळतं, ही गोष्ट महाराष्ट्रातील एका शेतकरी कन्येनं सिद्ध करून दाखवली आहे. सर्व आर्थिक अडथळे पार करत शेतकऱ्याची मुलगी असलेल्या ऐश्वर्या श्रीकृष्ण पवार हिने कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली ऐश्वर्या दहावीपर्यंत जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी होती. पुढे आर्थिक समस्येवर मात करून तिने बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. मात्र, उच्च शिक्षणासाठी आणखी पैसे कुठून आणायचे अशा द्विधा मनस्थितीचा तिनं सामना केला. “प्रामुख्यानं आर्थिक अडचणी आपल्या समाजातील शेकडो बुद्धिमान मुलांच्या प्रगतीत अडथळा ठरतात,” असं ऐश्वर्याचं मत आहे.
इयत्ता 10वी मध्ये 97 आणि इयत्ता 12वी मध्ये 83 टक्के गुण मिळवून तिने स्कॉलरशीप मिळवली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिच्या आईला विद्याधन शिष्यवृत्तीची जाहिरात दिसली होती. याच पैशांचा उपयोग तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झाला. ऐश्वर्याने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून शिवाजी विद्यापीठातील ‘नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी’ विभागात पदवीसाठी प्रवेश मिळवला. तिथेच तिला नॅनोसायन्स आणि टेक्नॉलॉजीची सखोल माहिती मिळाली.
ऐश्वर्याने 2020 मध्ये 92.4 टक्के गुणांसह पदवीची अंतिम परीक्षा पास केली. त्यानंतर, सप्टेंबर 2021 मध्ये, तिने कॅनडातील अल्बर्टा युनिर्व्हसिटीत केमिकल अँड मटेरिअल्स इंजिनीअरिंग विभागात एमएस्सीसाठी प्रवेश मिळवण्याच्या हेतूनं ऑनलाइन अर्ज केला. नोव्हेंबर 2021 मध्ये तिने प्राथमिक मूल्यांकन आणि मुलाखत फेरी पार करून अल्बर्टा युनिर्व्हसिटीत प्रवेश मिळवला.
ती अल्बर्टा युनिर्व्हसिटीत, पॉलिमर्स, एनर्जी आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंग, नॅनोफॅब्रिकेशन आणि मटेरियल सायन्स यांसारख्या महत्त्वपूर्ण संशोधन क्षेत्रात ज्ञान व अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या, ती युनिर्व्हसिटीच्या केमिकल्स अँड मटेरियल इंजिनीअरिंग विभागात ‘डिग्रेडिंग मिथिलीन ब्लू ZnO-Fe 3 O 4 या नॅनोकॉम्पोझिट्सच्या रिव्हर्सिबिलिटी’बाबत संशोधन करत आहे.
“माझ्या पदवीच्या दुसर्या वर्षात, मी पॉलिमर-बेस्ड बायोप्लास्टिक्सबाबत प्रोजेक्ट केला होता. ज्यामध्ये मी सिल्व्हर नॅनोपार्टिकल्स आणि बायोप्लॅस्टिक फिल्म्सच्या ग्रीन सिंथेसिस व स्टार्चपासून एकाच टप्प्यात अँटिबॅक्टेरियल बायो-प्लॅस्टिक तयार करण्याची पद्धत विकसित केली होती. माझ्या या प्रोजेक्टला आणि रिसर्च पेपरला ‘नॅशनल रिसर्च रायटिंग कॉम्पिटिशन’मध्ये सर्वोत्कृष्ट पेपरचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझ्यातील संशोधनाच्या आवडीला प्रोत्साहन मिळालं,” असं ऐश्वर्यानं News18.com ला सांगितलं.
“मी त्याच वर्षी फोटो-कॅटॅलिटिक डाय डिग्रेडेशनवर काम केलं आणि ‘इमिडॅकलोप्रिड’ हे कीटकनाशक यशस्वीरित्या नष्ट केले. इमिडॅकलोप्रिड हे Fe 3 O 4 -सिल्व्हर नॅनोकॉम्पोजिट्सद्वारे तयार होणार प्रदूषक आहे. ग्रॅज्युएशन दरम्यान वर्गातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश असल्याने माझं शैक्षणिक रेकॉर्ड चांगलं होतं. याशिवाय, मी को-करिक्युलर अॕक्टिव्हिटींमध्ये सक्रियपणे भाग घेतला, त्याचाही फायदा झाला,” असंही ऐश्वर्या म्हणाली.
ऐश्वर्या परदेशात तिच्या मास्टर्स डिग्री पूर्ण करत असताना अर्धवेळ शिक्षिका म्हणूनही काम करत आहे. ती कॅनडातील माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी होम ट्युशन घेते. तिने गेल्या वर्षी आयईएलटीएस परीक्षेत सात बँड्स मिळवले होते. आयईएलटीएस ही, उच्च शिक्षण आणि जागतिक स्थलांतरासाठी घेण्यात येणारी इंग्रजी भाषा प्रवीणता चाचणी आहे.