आज दि.२६ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारतीय महिला क्रिकेट संघाने
ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला

भारतीय महिला क्रिकेट संघाने यास्तिका भाटिया आणि शफाली वर्माच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाचा २ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.३ षटकांत साध्य केले. भारताकडून शफाली वर्माने ५६ आणि यास्तिका भाटियाने ६४ धावांची मौल्यवान खेळी खेळली. वनडेमधील दोन्ही खेळाडूंचे हे पहिले अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियन संघाला वनडेमध्ये ४ वर्षानंतर पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी झाला. मिताली अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखला. ऑस्ट्रेलियाचा संघ शेवटच्या २६ एकदिवसीय सामन्यांपासून अजिंक्य होता.

मुंबईसह राज्यात
पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबामध्ये वाढल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, गुलाब नावाचे हे चक्रीवादळ पुढील १२ तासात उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशावरुन जाऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईच्या हवामानात दिसून येईल. २७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत मुंबईकरांना सतर्क करण्यात आले आहे.

सांगलीत शेतकऱ्यांनीच
उभारले हवामान केंद्र

भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. यामुळेच शेती करताना हवामानातील सतत होणारे बदल समजणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरू लागले आहे. या गरजेतूनच जत तालुक्यातील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतातच हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यातील यंत्रणेद्वारे ते ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेत त्यानुसार निर्णय घेऊ लागले आहेत.

प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे,
भाजप आरएसएसचे नाही : अब्दुल्ला

जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी बोलताना शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. त्यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल भाजपला फटकारले. तसेच प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं. “प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे. प्रभू राम हे फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले.

भारताच्या 157 दुर्मिळ ऐतिहासिक
वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांना दिल्या

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर पंतप्रधानांनी संबोधनपर भाषण देखील केलं. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या आहेत.

लासलगाव विंचूर रस्त्यावर
अपघात पाच जण जागीच ठार

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ॲपेरिक्षा यांची धडक होऊन, पाच जण ठार झाले. मृतांमध्ये लोणी प्रवरा (अहमदनगर) येथील दोघांचा समावेश आहे. ॲपेरिक्षा प्रवाशांना घेऊन निघाली होती. समोरून आलेल्या ट्रकशी धडक झाली.

मध्यप्रदेशात महिला
कॉन्स्टेबलवर तिघांचा बलात्कार

मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात एका महिला कॉन्स्टेबलवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी सांगितले.

भारत कॅनडा विमानसेवा
लवकरच सुरू होणार

कॅनडात राहणाऱ्या हजारो भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनडाने सुमारे ५ महिन्यांनंतर भारतातून थेट उड्डाणांवरील बंदी उठवली आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना कॅनडाने एप्रिलमध्ये ही बंदी घातली होती. त्यानंतर आता विमान सेवा देणाऱ्या कॅनडा एअर सोमवारपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे सुरू करू शकणार आहे. त्याचबरोबर, भारतातील एअर इंडिया ३० सप्टेंबरपासून उड्डाण सुरू करू शकणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
संपत्तीमध्ये 22 लाखांनी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निव्वळ संपत्ती 3.7 कोटी आहे, जी गेल्या वर्षीच्या 2.85 कोटींच्या तुलनेत 22 लाखांनी वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, त्यांनी आपल्या घोषणेमध्ये याचा उल्लेख केला आहे.

फ्लिपकार्ट देणार ॲमेझॉनला
टक्कर, सेलची तारीख बदलली

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांचे लक्ष लागून राहिलेल्या Flipkart Big Billion Days Sale च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा सेल 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार होता. मात्र, 3 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया फेस्टिव्हलच्या एक दिवस आधी बिग बिलियन डेजची विक्री सुरू होईल. त्यामुळे या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.