गाय हा आॕक्सिजन घेणारा आणि सोडणारा प्राणी; अलाहाबाद कोर्ट

गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. तसंच गायीचे दूध, दही आणि तूप, गौमूत्र आणि शेणापासून तयार केलेले पंचद्रव्य अनेक असाध्य रोगांसाठी फायदेशीर आहे.

असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या एका निकालात म्हटलंय. जावेद नावाच्या व्यक्तीचा जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हे निरीक्षण नोंदवले. जावेदवर त्याच्या साथीदारांसोबत मिळून तक्रारदार खिलेंद्र सिंहच्या गायीची चोरी आणि हत्या केल्याचा आरोप आहे.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, “हिंदू धर्मानुसार गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचं वास्तव्य आहे. ऋग्वेदात गायीला अघन्या, यजुर्वेदमध्ये गौर अनुपमेय आणि अथर्ववेदात संपत्तीचं घर म्हटलं गेलंय. भगवान श्रीकृष्णाला सर्व ज्ञान गायींकडून मिळाले.” कोर्टाने पुढे म्हटलंय की ” येशूने एखादी गाय किंवा बैलाला मारणे हे मानवाला ठार मारण्यासारखे आहे, असं म्हटलंय. तर, बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते की तुम्ही मला मारा पण गाईला मारू नका. तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांनी संपूर्ण गोहत्या बंदीची बाजू मांडली होती. भगवान बुद्धांनी गायीला माणसाचा मित्र म्हटलंय. तर जैन लोकांनी गायीला स्वर्ग म्हटले आहे. भारतीय राज्यघटना तयार करताना, संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी मूलभूत अधिकारांमध्ये गोरक्षणाचा समावेश करण्यात यावा, असं म्हटलं होतं.”

“हिंदू लोक शतकानुशतके गायीची पूजा करत आहेत. इतर धर्मातील लोक देखील हे मान्य करतात आणि यामुळेच मुघलांच्या काळात इतर धर्मातील नेत्यांनी गोहत्येला कडाडून विरोध केला होता. हे सांगण्याचा हेतू हाच की देशातील बहुसंख्य मुस्लिम नेतृत्व नेहमीच गोहत्या बंदीच्या देशव्यापी बंदीच्या बाजूने आहे. ख्वाजा हसन निजामी यांनी एक चळवळ सुरू केली होती. त्यांनी ‘तार्क ए गाओ कुशी’ नावाचे एक पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी गायींची हत्या न करण्याबद्दल लिहिले होते. सम्राट अकबर, हुमायूं आणि बाबर यांनी त्यांच्या राज्यात गाईची हत्या करू नये असे आवाहन केले होते.” असं न्यायालयाने सांगितलं.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, “जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदचे मौलाना महमूद मदानी यांनी भारतात गोहत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा आणण्याची मागणी केली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची आणि हिंदूंच्या मूलभूत अधिकारांमध्ये गोरक्षणाचा समावेश करण्याची गरज आहे. जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच या देशाचे कल्याण होईल आणि कधीकधी गाईच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी बोलणारेच गायीचे भक्षक बनतात हे खूप वेदनादायक असते,” असेही कोर्टाने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.