मंत्री सुनील केदार यांच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई करा अशा आशयाचे एक पत्र काँग्रेस पक्षाच्या नेत्याने लिहिले आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

2002 मध्ये मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप सुनील केदार यांच्यावर आहेत. या प्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे.

हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे. आता या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करत अॅडव्होकेट असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

यासोबतच मंत्री सुनील केदार यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी करणारे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

आशिष देशमुख हे 2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.

(फोटो गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.