पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता
तब्बल ४२ टक्क्यांनी झाली कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय.
विघातक शक्ती फार काळ
वर्चस्व गाजवू शकणार नाही
दहशतवादाद्वारे साम्राज्य निर्माण करण्याच्या विचारधारेचे पालन करणाऱ्या विघातक शक्ती, काही काळासाठी वर्चस्व गाजवू शकतील परंतु त्यांचे अस्तित्व कायमचे नाही. ते मानवतेला कायमस्वरूपी दडपू शकत नाहीत.” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं आहे. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या काही प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या
सर्व्हेत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी
देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २९ टक्के लोकांची पसंती आहे. तर टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. या सर्व्हेत लोकांची मत जाणून घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंडिया टुडे ‘मूड ऑफ द नेशन’नं हा सर्व्हे केला.
कागल तालुक्यात
नरबळी देण्याचा प्रकार
बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार आज कागल तालुक्यात घडला मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी मारुती वैद्यला ताब्यात घेतले आहे. मुलगा व्हावा नरबळी देण्याचा हा प्रकार केल्याचीही चर्चा आहे.
रेल्वे सेवांबद्दल फिडबॅक घेण्यासाठी
रेल्वेमंत्र्यांनी केला प्रवास
प्रवाशांना रेल्वे सेवांबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी गप्पा मारल्या आणि रेल्वे सेवांबद्दल फिडबॅक घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे आणि देशातील विकासाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दलही सांगितले. वैष्णव गुरुवारी भुवनेश्वर येथे ‘जन आशीर्वाद यात्रा’ सुरू करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे
यांना करोनाची लागण
गेल्या काही दिवसांपासून करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी करोनाचा धोका काही टळलेला नाही. आता लसीचे दोन डोस घेतलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
बुलढाण्यात भीषण अपघात; डंपर
उलटल्याने १२ जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला आणि मोठा अपघात घडला.
लसींची कमतरता, नागरिकांना
दुसऱ्या डोसची प्रतिक्षा
देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसतेय. अशातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आलाय. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून अनेकांनी लसी घेतल्या आहेत. लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम मंदावत असल्याचं चित्र समोर आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुस-या डोससाठी प्रतीक्षा करावी लागतेय.
राज्यात कोरोना रुग्णांच्या
मृत्यू संख्येत वाढ
सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याचे वाटत असले तरी चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात 5225 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. काल दिवसभरात 154 रूग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या साताऱ्यात 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोविडचे नियम कटाक्षाने पाळण्यात यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुठेही गर्दी करु नका, मास्क वापरा असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात काही भागांत
मुसळधार पावसाची शक्यता
येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
SD social media
9850 60 3590