माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि
कुटुंबाची ४ कोटीची मालमत्ता जप्त
ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २० लाखाची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याअगोदर चौकशी सुरू असतानाच त्यांनी पैशांचा अनधिकृतरित्या मोठा व्यवहार केल्याचे पुरावे अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती लागले होते, त्यामुळे त्यांच्यावर मनी लाँड्रिगच्या आरोपाखाली चौकशीचा फासही आवळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात आज ईडीने ही कारवाई केली.
राज्यातील दहावीचा निकाल
९९.९५ टक्के लागला
राज्यातील दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. या निकालाची माहिती देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा केली. यावर्षी दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून त्यात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात कोकणने बाजी मारली आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आहे. राज्यात ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे.
१८ वर्षांखालील मुलांचं लसीकरण
लवकरच सुरु करण्यात येणार
देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आता जोर धरू लागली आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण तर वेगात सुरू आहेच. मात्र आता १८ वर्षांखालील मुलांचं लसीकरणही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
दोन लस घेतलेल्यांना
राज्यात प्रवेश मिळणे सोपे
ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.
RSS ची विचारसरणी आडवी आल्याने
संबंध बिघडले : इम्रान खान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत सुधरू शकलेले नाहीत. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधले संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, आता या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ची विचारसरणी आडवी आल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले, पत्रकारांशी बोलताना इम्रान यांनी हे वक्तव्य केले.
टी-२० वर्ल्डकपमध्ये
भारत-पाकिस्तान एकाच गटात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता.
जीएसटी नुकसान भरपाईपोटी
महाराष्ट्राला मिळाले ६५०१.११ कोटी रुपये
केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सर्व राज्ये आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा कराच्या नुकसान भरपाईपोटी एकापाठोपाठ एक कर्ज घेण्याच्या सुविधेअंतर्गत, ७५ हजार कोटी रुपये निधी वितरीत केला आहे. जीएसटी नुकसान भरपाईपोटी उपकर संकलनामधून दर दोन महिन्यांनी राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या व्यतिरिक्त ही नुकसान भरपाई केंद्राकडून दिली जात आहे. महाराष्ट्राला पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५९३७.६८ कोटी रुपये तर दोन वर्षांच्या कालावधीसाठी ५६३.४३ असा एकूण ६५०१.११ कोटी रुपये निधी या नुकसानभरपाई पोटी वितरीत करण्यात आला
इन्फोसिस करणार ३५ हजारांहून
अधिक कर्मचाऱ्यांची भरती
प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिस २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल ३५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या भरतीमध्ये फ्रेशर्सला संधी देण्यात येणार आहे. तसेच जुलैपासून वेतनवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहिती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी दिली आहे.
पंजाब काँग्रेसमधील धुसफूस
शमण्याची चिन्हे नाहीच
पंजाब काँग्रेसमधील धुसफूस शमण्याची चिन्हे नसून उलट ती वाढण्याची चिन्हे आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्याच्या काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुद्धा आपल्या निकटवर्तीय मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देण्याची शक्यता त्यांच्या माध्यम सल्लागारांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक सापते आत्महत्याप्रकरणी
राकेश मौर्य गजाआड
कला दिग्दर्शक राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्य याला गजाआड करण्यात यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीज हॉटेलमधून मौर्यला अटक केली. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा पदाधिकारी आहे. अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी तो वकिलांना भेटायला पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे. कला दिग्दर्शक राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती.
ओबीसींच्या डेटामध्ये तब्बल
69 लाख चुका होत्या : बावनकुळे
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचं खोटं बोल रेटून बोल आणि ओबीसींचा सत्यानाश कर असा धोरण आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ओबीसींच्या डेटामध्ये तब्बल एकूण 69 लाख चुका होत्या. तरीही काल पृथ्वीराज चव्हाण हे सर्व माहीत असताना खोटे बोलले असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
पुढील 48 तास जोरदार
पावसाची शक्यता
राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे. दुसरीकड मुंबई उपनगरांमध्येही पावसाची संततधार दिसून येत आहे. दरम्यान, पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारताने विकसित केले रॅपिड
इलेक्ट्रॉनिक कोविड टेस्ट किट
गेल्या वर्षभरापासून देश कोरोना व्हायरसशी लढा देतोय. तर नुकतंच जागतिक आरोग्य संस्थेने जगभरात तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाला असल्याचं सांगितलंय. दरम्यान या लढ्यामध्ये भारताने अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. हैदराबादच्या एका प्रोफेसरने एक नवं किट ‘COVIHOME’ केलं आहे. हे भारतातील पहिलं रॅपिड इलेक्ट्रॉनिक कोविड टेस्ट किट आहे. या किटच्या माध्यमातून अगदी सोप्या आणि सहजरित्या कोविड टेस्ट करता येणार आहे.
कोरोनाचा डेल्टा प्रकार
जगातील 104 देशांमध्ये
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रोस एडहानॉम घेब्रेयसस यांनी कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा विनाशकारी उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरसचे नवीन रूप लोकांमध्ये लवकर संक्रमित होत आहे. टेड्रास यांनी जिनेव्हा येथील पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘जगातील कोविड प्रकरणात दहा आठवडे घट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण 4 आठवड्यांपासून वाढू लागले आहेत. या व्यतिरिक्त मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होत आहे. डेल्टा प्रकार संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे, ज्यामुळे पुन्हा मृत्यू आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. हा प्रकार जगातील 104 देशांमध्ये सापडला आहे.
SD social media
9850 60 3590