खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नावलौकिक वाढवावं म्हणून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी तोक्यो ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या तामिळनाडूच्या खेळाडूला 3 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचं जाहीर केलंय. याशिवाय रौप्य पदक (Silver medal) जिंकणाऱ्या खेळाडूला 2 कोटी रुपये आणि कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 1 कोटी रुपये रोख रकमेचा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलीय
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार कटिब्ध आहे. त्याचाच भाग म्हणून हा रोख रकमेचा पुरस्कार सरकारकडून देण्यात येईल. राज्य सरकार कायमच खेळाडूंना पाठिंबा आणि प्रोत्साहन देईल. खेळाडूंना शारीरिक मजबूती आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. आम्ही डीएमकेच्या (द्रविड़ मुनेत्र कषगम) घोषणापत्रात तामिलनाडूत 4 विभागात ऑलिम्पिक अकॅडमी स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही ते पूर्ण करणार आहोत.”
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तोक्यो ऑलम्पिकचं (Tokyo Olympics) आयोजन एक वर्षे उशिरा करण्यात आलंय. आता यंदा ही स्पर्धा 23 जुलै रोजी सुरू होईल. दरम्यान, तामिळनाडूत खेळाडूंसाठी विशेष कोरोना विरोधी लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नेहरू स्टेडियमवर याचं उद्घाटन केलं. तामिलनाडू खेळ विकास प्राधिकरणाच्या युवा कल्याण आणि खेळ विभाग, आरोग्य विभाग आणि तामिळनाडू ऑलम्पिक संघाने संयुक्तपणे या लसीकरण शिबिराचं आयोजन केलं होतं.
लसीकरणात सहभागी झालेल्या 6 खेळाडूंना प्रत्येकी 5 लाख रूपयांची रोख प्रोत्साहन रक्कम
या कार्यक्रमाच्या वेळी स्टॅलिन यांनी लसीकरणात सहभागी झालेल्या 6 खेळाडूंना प्रत्येकी 5 लाख रूपयांची रोख प्रोत्साहन रक्कम दिली. यात नौकायनात ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेल्या नेथरा कुमानन, वरुण ठक्कर आणि के सी गणपती यांच्याशिवाय टेबल टेनिस खेळाडू जी साथियन आणि शरथ कमल आणि पॅरालंपियन टी मरिअप्पन यांचा समावेश आहे.