आज दि.३ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष! 

एकनाथ शिंदे सरकारनं विधानसभेतील पहिली लढाई जिंकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. नार्वेकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. या निवडणुकीत नार्वेकरांना 164 तर साळवी यांना 107 मतं मिळाली.

‘मंडळ चालवत आहेत की पक्ष?’, मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं

शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विषयावर पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे. आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये छापून आले होते. त्यानंतर काही तासांमध्येच पक्षानं यु टर्न घेत ही कारवाई मागे घेतली आहे.सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवसेनेतील या गोंधळावर मनसेनं टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार? फडणवीसांचं मोठं विधान

राज्यात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार स्थापन झालं होतं. या सरकारने गेल्या सरकारचे काही महत्त्वाचे निर्णय मागे घेतले होते. त्यामध्ये जलयुक्त शिवार, मेट्रोच्या आरे कारशेडसह आणखी काही निर्णयांचा समावेश होता. विशेष म्हणजे ठाकरे सरकार अडीच वर्षात कोसळलं आहे. त्यामुळे नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस हे सरकार आता ठाकरे सरकारने घेतलेले मोठे निर्णय बदलण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वत: प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलं. गेल्या सरकारचे सर्व निर्णय सरसकट बदलणार नाही. पण ज्या तून भ्रष्टाचाराचा दुर्गंध येताना दिसेल ते निर्णय मागे घेतले जातील, असं विधान फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने घेतलेले काही निर्णय खरंच रद्द केले जावू शकतात, अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीचे समन्स

महाराष्ट्रासाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंचे निकटवर्तीय असलेले मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतंच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या पाठिमागे आता ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा;सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी

विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली.भाजपचे राहूल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आले. दरम्यान उपाध्यक्षांच्या भाषणानंतर काही नेत्यांची भाषणे झाली यामध्ये सुधिर मुनगुंटीवार यांनी भाषणातून अजित पवारांना पुन्हा डिवचल्याने जोरदार चर्चा रंगली. यावेळी मुनगुंटीवर म्हणाले कि, अजितदादा, तुम्ही म्हणालात की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या कानात सांगितले असते तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असती. ते आता शक्य नाही, त्यांची चूक झाली. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला आयुष्यात असे जर कधी वाटले तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा. तुम्ही या अगोदर सांगितले होते पण तेव्हा (२३ नोव्हेंबर) ते जमले नाही. आणि जयंत पाटील यांच्या कानात कधीच सांगू नका. त्यांच्यात कानात सांगणे धोक्याचे आहे”, अशी कोपरखळी मुनगंटीवार यांनी मारली.

शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर  अखेर आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. शिंदे सरकारने आपली पहिली लढाई जिंकली आहे. पण, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेनं 39 आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, मास्टरमाईंडसह 2 दहशतवाद्यांना अटक

कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 30 जून रोजी यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन हे या दहशतवाद्यांची नावं आहेत. यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या श्रेणीतील दहशतवादी आहे. त्यांच्याकडून 2 AK-47 रायफल, 7 ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी 2 लाख तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 5 लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे.

उमेश कोल्हे हत्याकांड : आरोपी युसूफ खान आणि उमेश कोल्हेंचे व्यावसायिक संबंध, अत्यंयात्रेतही सहभागी

येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी युसूफ खान (४४) याचे आणि उमेश कोल्हे यांचे चांगले संबंध होते आणि तो कोल्हे यांच्या अंत्यविधी कार्यक्रमातही सहभागी झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. त्यात युसूफ खान याचा समावेश आहे. युसूफ खान हा पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, तर उमेश कोल्हे हे पशूवैद्यकीय औषधी विक्रेते होते. दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते, त्यामुळे कोल्हे यांच्याशी तो संपर्कात होता. कोल्हे यांच्याकडील काही कार्यक्रमांमध्ये देखील युसूफ खान सहभागी झाला होता. एवढेच नव्हे, तर कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या वेळी तो उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी युसूफ खानला तांत्रिक तपासाच्या आधारे शुक्रवारी रात्री अमरावतीतून ताब्यात घेतले.मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ऊर्फ इरफान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली होती.

“मोदी सरकारला फक्त काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर विरोधी पक्षमुक्त भारत हवाय”, कपिल सिब्बल यांची टीका

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की न्यायव्यवस्थेतील काही सदस्यांनी आम्हाला निराश केलं आहे. अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या, त्यामुळे माझं डोकं शरमेनं झुकलं आहे. सिब्बल पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ लावला आहे, तो दुर्भाग्यपूर्ण आहे. घटनात्मकदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जे स्थान आहे, ते स्थान त्याला मिळालं नाही.केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करताना सिब्बल म्हणाले की, न्यायव्यवस्थेची गळचेपी करून त्यांनी प्रत्यक्षात आणीबाणी आणली आहे. देशात दररोज कायद्याचे उल्लंघन केलं जात आहे. सध्याच्या केंद्र सरकारला केवळ काँग्रेसमुक्त भारत नकोय तर विरोधी पक्षमुक्त भारत हवा आहे, असंही सिब्बल पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.