राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे.
शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे.