जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने थेट पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंडे, वडेट्टीवार काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
धुळ्यात 15, नंदूरबारमध्ये 11,अकोल्यात 14, वाशिममध्ये 14 आणि नागपूरमध्ये 16 जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात 30, नंदूरबारमध्ये 14, अकोल्यात 28, वाशिममध्ये 27 आणि नागपूरमध्ये 31 पंचायत समिती निर्वाचक गणामध्ये निवडणुका होणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. आयोगाच्या आदेशानुसारच या निवडणुका होत असल्याचं मदान यांनी सांगितलं. त्यामुळे पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विजय वडेट्टीवार त्यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता.