वीकएंडला सामान्यांना पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका

एकीकडे देशात करोनाचं संकट ठाण मांडून बसलेलं असताना, लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील करोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आता तर पेट्रोलनं काही भागांमध्ये शंभरी देखील गाठली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असा गौरव मिरवणाऱ्या मुंबईचा देखील समावेश आहे. त्यामुळे देशाचं किंवा राज्याचं बजेट नेतेमंडळी काय करतील ते करतील, पण आपलं घराचं महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं? असा यक्षप्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. रविवारी वीकएंड मूडमध्ये असलेल्या सामान्यांना हा यक्षप्रश्न अधिक गहिरा करणारा झटका बसला तो पुन्हा झालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा!

शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी पुन्हा दरवाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपये २२ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ८७ रुपये ९७ पैसे दराने विकलं जात आहे. दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलसाठी मुंबईकरांना प्रतिलिटर १०३ रुपये ३६ पैसे तर डिझेलसाठी ९५ रुपये ४४ पैसे मोजावे लागत आहेत (Todays Perol Price in Mumbai). भोपाळमध्ये हेच दर अनुक्रमे १०५ रुपये ४३ पैसे आणि ९६ रुपये ६५ पैसे इतके आहेत. तर दुसरीकडे पाटण्यामध्ये अनुक्रमे ९९ रुपये २८ पैसे आणि ९३ रुपये ३० पैसे दर झाले आहेत.

गेल्या महिन्याभरात देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी गाठली आहे. राज्यांच्या राजधान्यांमध्ये सर्वात आधी भोपाळमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी पार केली. त्यापाठोपाठ जयपूर आणि मुंबईनं देखील आपला नंबर लावला. आता या यादीमध्ये हैदराबाद आणि बंगळुरूचा देखील समावेश झाला आहे.

राज्यांचा विचार करता गेल्या दीड ते दोन महिन्यांत झालेल्या पेट्रोल दरवाढीमुळे देशातील ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या वर गेले आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. एका आकडेवारीनुसार भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्हा पेट्रोलचे दर शंभरीपार नेणारा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे. गेल्या महिन्यात तर तिथे डिझेल देखील प्रतिलिटर १०० रुपयांच्य वर जाऊन पोहोचलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.