मुंबईसह कोकण किनारपट्टी
भागात रेड अलर्ट जारी
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोशात सलामी दिली. मुंबईत गेल्या काही तासांपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस कोसळत असून, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. पावसाची संततधार दिवसभर कायम आहे. तर पुढील चार दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. तसा अंदाज व्यक्त केला असून, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आगामी सहा महिन्यात उलाढालीतून
सकारात्मक परिणाम दिसू लागणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद झालेले उद्योग-धंदे, व्यवसाय लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. आगामी सहा महिन्यात (जुलै-डिसेंबर) होणाऱ्या उलाढालीतून सकारात्मक परिणाम दिसू लागणार आहेत. फिच सॉल्यूशन या संशोधन करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, ग्राहकांचा खर्च २०२१ मध्ये ९.१ टक्के दराने वाढणार आहे. गेल्या वर्षी हा दर ९.३ टक्क्यांनी घसरला होता. या दरम्यान भारतीय ग्राहक ७३.३ लाख कोटी रुपये खर्च करू शकतात, असे अहवालात नमूद आहे. कंपनीने ग्राहक आउटलूक २०२१ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई
भत्ता जमा होण्याची शक्यता
आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2.80 लाख रुपये जमा होऊ शकतात. सरकार लवकरच या निर्णयाची घोषणा करु शकते. 1 जानेवारी 2020 आणि 1 जुलै 2020 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम देण्यावर स्थगिती दिली होती.
आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता,
आहे आणि राहिल : जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आघाडी सरकार आणि इतर मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडली. “आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल. मात्र, आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे,” असं सांगत २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील,” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी
संशोधित दिशानिर्देश जाहीर
देशात १८ वर्षांवरील सर्व लोकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सरकारने २१ जूनपासून लागू होणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी संशोधित दिशानिर्देश जाहीर केले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्या, कोरोनारुग्णांची संख्या आणि लसीकरणाची प्रगती या आधारावर लशींचा पुरवठा केला जाणार आहे. लशींचे डोस वाया जाऊ देऊ नये अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. जितके लशींचे डोस वाया जातील त्याच तुलनेत लशीच्या पुरवठ्यात घट केली जाईल.
एकाधिकाराचा दुरुपयोग, गुगलला
तब्बल २७ कोटी डॉलर दंड
गुगल आणि इतर कंपन्यांच्या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठवणे वेगळे आणि प्रत्यक्ष कारवाई करून दाखविणे वेगळे. फ्रान्सने ते करून दाखविले. ऑनलाईन जाहिरातीच्या क्षेत्रात एकाधिकाराचा दुरुपयोग करण्याच्या आरोपात आता गुगलला तब्बल २७ कोटी डॉलर म्हणजे जवळपास १ हजार ९४७ कोटी रुपयांचा दंड फ्रान्सकडे भरावा लागणार आहे. फ्रान्समधील आयोगाकडे गुगलने दंड भरण्याचे कबुलही केले आहे.
“राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला
भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. “राहुल गांधींच्या जवळचे सगळेच नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाच हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वत: भाजपात प्रवेश करावा, हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर टीका करतानाच त्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते
जितिन प्रसाद भाजपामध्ये
केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत!
एफएआयएमएच्या नोटीशीत
दम नाही : रामदेव बाबा
योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील अॕलोपॅथी उपचारावर आक्षेप घेतल्यानंतर देशभर वादळ उठले. रामदेव यांच्याविरोधात त्यांचेच लोक जाऊ लागले. फेडरेशन आफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननेही (एफएआयएमए) त्यांना नोटीस पाठवली. आपले विधान मागे घेत रामदेव यांनी वातावरण शांत केले. आता दहा दिवसांनंतर रामदेव यांनी पलटवार करीत एफएआयएमएच्या नोटीशीत दम नसल्याचे विधान केले आहे. अॕलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक हा संघर्ष जुना आहे. रामदेव बाबांनी कोरोनाच्या निमित्ताने उडी घेतली. आयुर्वेदाचे समर्थन करणाऱ्या केंद्र सरकारशी त्यांचे नातेही घनिष्ट आहे.
मंगळ ग्रहावरून माती पृथ्वीवर
आणण्याची योजना
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहावरून एकत्र केलेली धूळ आणि माती पृथ्वीवर आणण्याची योजना आखत आहे. नासाच्या या योजनेची अंमलबजावणी झाल्यास ती जगातील सर्वात महागडी वस्तू ठरेल. मानव जातीसाठी हा सर्वात महाग पदार्थ असणार आहे. नासाचे हे सर्वाधिक महाग अभियान आहे. या अभियानात जवळपास ९ अब्ज डॉलर खर्च होणार आहे. नासा आपल्या तीन अंतराळ अभियानादरम्यान मंगळावर प्राचीन जीवसृष्टी होती की नाही हे जाणून घेण्यासाठी २ पाउंड मंगळावरील माती पृथ्वीवर आणणार आहे.
कोरोना विषाणूने ४७ वेळा
आपले रूप बदलले
कोरोना विषाणूच्या म्युटेशनबाबत वेगवेगळ्या संशोधनात वेगवेगळे आश्चर्यचकित करणारे खुलासे होत आहेत. संशोधकांनी केलेल्या संशोधनात एकाच राज्यात विषाणूने तब्बल ४७ वेळा आपले रूप बदलल्याचे आढळले आहे. तर इतर राज्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. विषाणूमध्ये म्युटेशन वेगाने होत असल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तिसरी लाट अधिक घातक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात केलेल्या अभ्यासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
SD social media
9850 60 3590