जालना जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय आणि व्यवहार सुरू ठेवावेत. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत.
जालना जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.05 टक्के असून ऑक्सिजन बेड व्यापलेली टक्केवारी 17.65 टक्के इतकी आहे. त्यामुळे जालना जिल्हा शासनाने घोषित केलेल्या पहिल्या स्तरामध्ये समाविष्ट झाल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याची गरज आहे. या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी, असे निर्देश टोपे यांनी दिले.
म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना याची खबरदारी घेण्यात यावी. प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांनी याबाबत दक्ष राहून काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. काही खासगी रुग्णालयांची या आजारावर उपचार करण्यासाठी जनआरोग्य योजनेत नोंद झालेली नाही. मात्र, तरीही अशा खासगी रुग्णालयात या आजारवर रुग्ण उपचार घेत असेल तर या रुग्णालयांसाठीही उपचाराची दर निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार नाही, याचीही दक्षता घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.
जालना जिल्ह्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक व कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. असं असलं तरी यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हायरिक्स व लोरिस्क सहवासितांच्या चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात याव्यात. तसेच गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घेण्यासाठी योग्य ते नियोजन करा, असे आदेशच त्यांनी दिले.