आज दि.७ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

२१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत
केंद्र सरकार उचलणार खर्च ; मोदींची मोठी घोषणा

भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी सायंकाळी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचं संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
कोरोना विरोधात कोव्हिड प्रोटोकॉल आणि व्हॅक्सिन संरक्षण कवच म्हणून उपयोगी पडले आहे. जगातील अनेक देशाला व्हॅक्सिनची मोठी गरज होती. पण त्यांच्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नव्हत्या. भारताकडे व्हॅक्सिन नसती तर काय झालं असतं याचा विचार करा, असं ते म्हणाले. 2014मध्ये व्हॅक्सिनेशनचे कव्हरेज 60 टक्के होते. या गतीने व्हॅक्सिनेशन केलं असतं तर 40 वर्ष लसीकरणाला लागले असते. मात्र आपण व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवला. त्याची व्याप्तीही वाढवली. भारतात आतापर्यंत 23 कोटी व्हॅक्सिन देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील ७० हजार आशा
कार्यकर्त्या बेमुदत संप करणार

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा वेठबिगार म्हणून आम्हाला राबवण्याचे काम सरकार करत आहे. आमची सुरक्षा, आमचे कुटुंब, कष्ट आणि मानधन यावर सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आमच्या कष्टाच्या मोदल्यावर एक शब्दही न काढता केवळ कौतुकाची रिकामी घागर ओतली आहे. त्यामुळे राज्यातील ७० हजार आशा कार्यकर्त्या नियोजित बेमुदत संप करणार असा निर्धार राज्यातील ‘आशां’ नी केला आहे.

अदर पूनावाला लंडनला
निघून गेले : हसन मुश्रीफ

केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसच्या दीड कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने तंबी दिली म्हणूनच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेले असाही आरोप त्यांनी केला आहे. ते नगरमध्ये बोलत होते.

२ लाखांहून अधिक पदे रिक्त
असल्याचे वास्तव उघड

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत.

कोरोनाच्या महालात झोपलेलं
भुताटकी सरकार : सदाभाऊ खोत

राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचं काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येते, अशी टीका खोत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
मुख्यमंत्री ठाकरे घेणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यात भरच पडली आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.

मेहुल चोक्सीचा अँटिग्वा पोलिसांकडे
अपहरण झाल्याचा दावा

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताला अद्याप प्रतिक्षा करावी लागणार आहे. मेहुल चोक्सीने डोमिनिकामधील कोर्टात याचिका दाखल केली असून याशिवाय अजून एका प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत. मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे केलेल्या आरोपात म्हटलं आहे की, “८ ते १० जणांनी अँटिग्वा पोलीस असल्याचं सांगत मला अमानुषपणे मारहाण केली. मी अजिबात शुद्धीत नव्हतो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतलं. मला लुटण्याचा हेतू नसल्याचं सांगत त्यांनी माझे पैसे परत केले”.

एक्साईजमध्ये वाढ करून
लूट केली : अशोक चव्हाण

देशात इंधनाच्या दरात सतत वाढ सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दररोज सुरू असलेल्या दरवाढीमुळे रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी लिटरला ९५ रुपयांचा, तर डिझेलच्या दरांनी ८६ रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने एक्साईजमध्ये वाढ करून लूट केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

राज्यपाल धनखर, खासदार मोइत्रा
यांच्यात कलगीतुरा

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खासदार महुआ मोइत्रा यांनी केलेले आरोपी राज्यपाल जगदीप धनखर यांनी फेटाळून लावले आहेत. राजभवनातील विशेष अधिकारी पदांवर आपले कुटुंबिय आणि ओळखीच्या लोकांना नियुक्त केल्याचा आरोप खासदार महुआ मोइत्रा यांनी केला होता. या आरोपांवर राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न लपवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याची टीकाही केली आहे.

डेरा प्रमुख राम रहीमला भेटण्यासाठी
हनीप्रीत रुग्णालयात

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम करोनाच्या आजाराशी झुंज देत आहे. तब्येत बिघडल्याने डेरा प्रमुखांना सुनारिया तुरूंगातून रोहतक पीजीआय आणि नंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयात दाखल डेरा प्रमुख राम रहीम यांना भेटण्यासाठी हनीप्रीत सोमवारी रुग्णालयात पोहोचली.

16 जिल्ह्यांमध्ये
पावसाची शक्यता

राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस झाला. गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाचा दिलासा मिळाला आहे. ठाणे, नवी मुंबईतही चांगला पाऊस झाला. तर नाशिकच्या चांदवड तालुक्यात ढगफुटी झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पाकिस्तान मध्ये रेल्वे अपघात,
30 प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील घोटकी इथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सर सय्यद एक्स्प्रेसची मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिली. रेती ते धारकी स्टेशन दरम्यान हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवाय (ARY) न्यूजच्या वृत्तानुसार, या बातमीचे वृत्त समजताच मदत आणि बचाव दल घटनास्थळी रवाना झाले आहे.

तिसऱ्या लाटेत उद्योग
सुरू ठेवावेत : मुख्यमंत्री

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.