उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा’, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
योजना आखून कोरोनामुळे विधवा झालेल्या निराधार महिलांना मदत करा. तसेच, कोरोना निराधार पालकत्व योजना राज्यभर राबवण्याची मागणी आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गेल्याने अनेक परिवारावर संकट ओढवलं आहे, त्यामुळे राजू पारवे यांनी ही मागणी केली आहे.
घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर
कोरोनाने कधीही भरुन न निघणाऱ्या जखमा दिल्या आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे सव्वादोन हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यात तरुणांचीही मोठी संख्या आहे. विशी, पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्याने त्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कुणी सात महिन्यांची गरोदर आहे तर कुणावर दोन मुलांची जबाबदारी आहे. तर कुणी घरी एकटं पडलं आहे. असे उघड्यावर पडलेली संसार बघून डोळे निश्चितच पाणवताय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याने, विशी-पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्या आहेत. ही समस्या फक्त नागपूर जिल्ह्यापूरतीच मर्यादीत नाही, तर राज्यभर अशाच प्रकारे अनेक परिवार उघड्यावर आलेय. त्यामुळे आ. राजू पारवे यांच्या प्रमाणेच समाज म्हणून लोकप्रतिनिधी, व्यावसायीक किंवा ज्यांना शक्य आहे, त्यांनी कोरोनाने अशाप्रकारे उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना आधार देणं गरजेचं आहे.
कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत. अशाच निराधार असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी मतदारसंघातील 350 पेक्षा जास्त कुंटुंबांना मंत्री विजय वडेट्टीवार मित्र परिवाराने प्रत्येकी दहा हजारांची मदत केलीय.