मावळच्या देहूगावात कोरोनाच्या प्रकोपानंतर आता डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. देहूगावात नुकतेच डेंग्यूचे 7 रुग्ण आढळून आले. देहूगावातील ओमकार सोसायटीमध्ये एका पाण्याच्या टाकीत आणि जवळच बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधी साठवलेल्या पाण्यातही डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या. या घटनेनंतर स्थानिक आरोग्य प्रशासन सर्तक झाले आहे.
आरोग्य विभागाकडून तात्काळ देहूगाव परिसरात कंटेनर तपासणी सर्व्हे करण्यात आला. यावेळी साठवलेल्या पाण्याचे स्रोत शोधून ते नष्ट करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने देहूगाव नगरपंचायतीला ड्राय डे पाळण्याबाबत पत्र दिले आहे. जे नागरिक ड्राय डे पाळणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्याचे समोर आले आहे. शहरातील पाच ‘सीसीसी’ सेंटर आणि ‘जम्बो’ कोविड सेंटर मधील नवीन रुग्णांची भरती बंद झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आत आली असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे.
रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर बंद तर दोन दिवसांपासून नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेणे देखील बंद केले आहे.
पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या 500 वरुन 56 इतकी झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या घटल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये मोठी घट झाली आहे. शहरातील पाच हजार बेडस सध्या रिक्त आहेत. जम्बो कोविड सेंटरमधील 700 पैकी 392 बेडस रिक्त आहेत. तर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आला आहे.