जन्म. २९ मे १९६१
विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे विजय पाटकर. विजय पाटकर यांचे मुंबईतील गिरगाव येथे बालपण गेले. येथील युनियन हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. १९७९ पासुन आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरवात केली, आंतर बँक नाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरवात केली. १९८३ पासुन त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, विजय पाटकर यांनी आपले अभिनयाचे करीयर सांभळून अनेक वर्षे बँक ऑफ इंडियात नोकरी केली होती. पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी नोकरी सोडून पुर्णवेळ अभिनयाला द्यायचा निर्णय घेतला.
त्यानंतर एन. चंद्रा यांनी विजय यांना हिंदी सिनेसृष्टीतील पहिला मोठा ब्रेक दिला होता. तेजाब या चित्रपटात एन. चंद्रा यांनी विजय पाटकर यांना अनिल कपूरच्या मित्राची भूमिका दिली होती. हिंदीमध्ये त्यांनी राइट या राँग, जाने कहा से आई है, ऑल द बेस्ट, वाँटेड, डॅडी कूल, सिंघम, गोलमाल अगेन, गोलमाल ३ सह अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’, ‘लावू का लाथ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय पाटकर यांची केले आहे. विजय पाटकर यांनी अभिनयाच्या बळावर जसे हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले, तेच स्थान त्यांनी मराठी इंडस्ट्रीतही निर्माण केले आहे. विनोदी अभिनेते म्हणून त्यांनी मराठीत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. विजय पाटकर यांनी मराठी व हिंदी मिळून १४२ चित्रपटांतून आणि ३५ नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत. विजय पाटकर यांनी ऑस्करच्या निवडसमितीत सदस्य म्हणून काम केले आहे.