राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही पाहायला मिळतोय. साधारण दीड हजार रुपयांच्या आत किंमत असलेले हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंतही विकलं जात आहे. नाशिक पोलिसांनी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या 9 जणांना मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 85 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिलीय.
नाशिकमध्येच काही दिवसांपूर्वी 3 महिला आणि एका तरुणाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या दराने विकताना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मंगळवारी या टोळीतील मुख्या सूत्रधार सिद्धेश पाटील याला अटक करुन त्याच्याकडून 63 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय. राज्यातील आतापर्यंतचही ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालय परिसरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. या परिसरात पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या तिनही महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. या आरोपींकडून पोलिसांनी 2 रेमडेसिव्हीर इंजेक्शन ताब्यात घेतले होते.
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या या टोळीत अजून काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली. चौकशीचे चक्र फिरल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 85 इंजेक्शन हस्तगत केले आहेत.
या टोळीतील मुख्य आरोपी सिद्धेश पाटील हा पालघरमध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीत काम करत होता. त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून 63 इंजेक्शन्स पोलिसांनी हस्तगत केलेत. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना तासंनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. तर दुसरीकडे संकटाच्याकाळात इंजेक्शनचा काळाबाजार करत लाखो रुपयांची कमाई हे आरोपी करत होते. दरम्यान नाशिकच्या आडगाव पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.