अभिनेता सुबोध भावे हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारा सुबोध भावे आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. याचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात सुबोध भावे हा महाराष्ट्रातील एका थोर संताच्या भूमिकेत दिसत आहे.
सुबोध भावेने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली होती. संत तुकारामाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुबोध हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच याचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सुबोधने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत हा लूक शेअर केला आहे.
सुबोध भावेची पोस्ट
“संत तुकाराम”
आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे.
ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे.
तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे.ती यथावकाश कथन करीन.
माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार.
आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया!”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
आपल्या अभंगातून जनमानसाला योग्य तो उपदेश करणाऱ्या, सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाला योग्य दिशा दाखवणाऱ्या संत तुकाराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात संत तुकारामांची भूमिका सुबोध भावे साकारणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम करत आहेत. तर पुरुषोत्तम स्टुडिओज आणि बी गौतम या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.