मुंबईत आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यात अधिवेशन आणि त्यातील आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद अधिवेशनाबाहेरही राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात झालेल्या हल्ल्यावरून मनसे आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मनसेनं खोचक ट्वीट केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्याच वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राऊतांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर “पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
संदीप देशपांडेंचं खोचक ट्वीट!
दरम्यान, यावरून संदीप देशपांडेंनी खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. “भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है” असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. तसेच, “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार.. मज्जा आहे बाबा एका माणसाची”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टोला लगावला आहे.