आपात्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी चेन खेचावी लागते, हे सर्वांना माहितच असेल. हा एक प्रकारचा एमरजन्सी ब्रेक असतो. पण महत्वाचं कारण नसताना ट्रेनची चेन खेचणं महागात पडू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे का, चेन सिस्टममध्ये मध्ये नेमकं काय असतं,ज्यामुळे ट्रेन लगेच थांबवली जाते. जर तुम्हाला माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला चेन खेचल्यानंतर ट्रेन कशी थांबते, याबाबत सांगणार आहोत. तसंच ट्रेनच्या कोणत्या डब्ब्यातून चेन खेचली आहे? याविषयी पोलिसांना कसं कळंत, याचीही माहिती तुम्हाला देणार आहोत.
ट्रेनचं ब्रेक सिस्टम कसं काम करतं?
चेन खेचल्यानंतर ट्रेन का थांबते, याबाबत माहिती करुन घेण्याऐवजी ट्रेनचे ब्रेक कसे लागतात, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ट्रेनचा ब्रेक नेहमीच लागलेला असतो. जेव्हा ट्रेनला चालवायचं असतं, तेव्हा ब्रेकला बाजूला करण्यात येतं. ब्रेक बाजूला केल्यानंतरच ट्रेन पुढे जाते. लोको पायलटला जेव्हा ट्रेन चालवायची असते, तेव्हा एअर प्रेशरच्या माध्यमातून ब्रेक चाकांपासून दूर केलं जातं. तसंच ट्रेनला जेव्हा थांबवायचं असतं, तेव्हा एअर प्रेशर बंद केला जातो. अशाप्रकारे ट्रेनचे ब्रेक लागतात.
चेन खेचल्यानंतर ट्रेन कशी थांबते?
ट्रेनच्या डब्ब्यात लावलेलं अलार्म चेन ब्रेक पाईपशी जोडलेलं असतं. जेव्हा ही चेन खेचली जाते, तेव्हा ब्रेक पाईपमधून हवेचा दाब बाहेर निघतो आणि ट्रेनमध्ये ब्रेक लागते जातात. ब्रेक लागल्यानंतर ब्रेक सिस्टममध्ये हवेचा प्रेशर अचानक कमी होतो. ड्रायव्हरला याबाबत सिग्नल आणि हूटिंग सिग्नल मिळतं. ज्यामुळे ड्रायव्हरला समजतं की, एकतर ट्रेनची चेन खेचली गेली आहे किंवा ट्रेनच्या ब्रेक सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे. त्यानंतर ड्रायव्हर यामागचं योग्य कारण तपासतो.
पोलिसांना कसं कळतं?
चेन खेचणाऱ्या प्रवाशाबद्दल माहिती मिळवण्यासाठी जुन्या पद्धतीचा वापर केला जातो. खरंतर, ट्रेनच्या ज्या डब्ब्यातून चेन खेचली जाते, तिथे एअर प्रेशर लीक झाल्याच्या जोरात आवाज येतो. या आवाजाच्या माध्यमातून भारतीय रेल्वे पोलीस फोर्स त्या डब्ब्यापर्यंत पोहचतं आणि तिथे असणाऱ्या प्रवाशांच्या मदतीनं चेन खेचणाऱ्या व्यक्तीला शोधतात. हे सर्व ब्रेक सिस्टमवर अवलंबून असतं. वॅक्यूम ब्रेक ट्रेनमध्ये चेन खेचल्यावर डब्ब्यातील वरच्या भागात असलेला एक वाल्व फिरतो, याला पाहिल्यानंतरही कोणत्या डब्ब्यातून चेन खेचली आहे, याबाबत कळतं.