काही दिवसांपूर्वी टर्कीत आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. टर्की आणि सीरीया देशात झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा प्राण गेला असून, लाखो जण जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्याची प्रक्रिया टर्कीत सुरु आहे. अशातच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने ( एनजीआरआय ) मोठा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता एनजीआरआय संस्थेने व्यक्त केली आहे.
एनजीआरआय संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. एन. पूर्णचंद्र राव यांनी सांगितलं की, “पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेटींमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत असून, मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.”
“हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ भूकंप केंद्रे स्थापन केली आहे,” अशी माहिती एन. पूर्णचंद्र राव यांनी दिली आहे.
दरम्यान, ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरं, दुकानं, हॉटेलांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हजारो लोकांना आपली घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे १९७६ पासूनच या भागात अशाप्रकारच्या घटनाक्रमांचे इशारे देण्यात आले होते.