अंडर-19 भारतीय महिला क्रिकेट टीमनं काही दिवसांपूर्वीच आयसीसीचा पहिला महिला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. यात इंग्लंडच्या संघाला 68 रनांमध्ये ऑलआउट करून भारतानं तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. या विजयामध्ये 19 वर्षीय अर्चना देवीने महत्त्वाची भूमिका बजावली. तिनं 3 ओव्हरमध्ये 17 रन देत 2 विकेट घेतल्या. या स्पर्धेत तिने एकूण 8 विकेट घेतल्या आहेत. अर्चना देवी ही उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आली. देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या अर्चनादेवीचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता.
अर्चनाची आई सावित्रीदेवी यांच्या म्हणण्यानुसार, मुलीला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. सावित्रीदेवी यांनी सांगितलं, ‘माझ्या पतीचा कॅन्सरनं मृत्यू झाला. अर्चनाच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र तिच्या लहानपणीच हरवलं. माझ्या मुलाचासुद्धा साप चावल्यानं मृत्यू झाला. त्यानंतर गावातील लोक मला ‘हडळ’ म्हणू लागले. त्यानंतर मुलीला तरी तिच्या आयुष्यात काहीतरी करता यावं, यासाठी मी शेती करण्यास सुरुवात केली आणि नशीब बदललं.
सावित्रीदेवी यांनी त्यांची मुलगी अर्चना हिला शिक्षणासाठी कस्तुरबा गांधी शाळेत घातलं. इथूनच तिचं नशीब बदललं. कारण इथेच तिची शिक्षिका पूनम गुप्ता यांच्याशी भेट झाली. गुप्ता यांनी अर्चनाच्या आईशी बोलून तिला चांगली खेळाडू बनवू, असे सांगितलं आणि तिला प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रात आणलं. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षिका पूनम गुप्ता यांच्यासोबत मुलीला पाठवण्यास सावित्रीदेवी यांना नातेवाईकांनीही विरोध केला होता. याबाबत सावित्रीदेवी म्हणतात,’लोक म्हणायचे की मी माझ्या मुलीला चुकीच्या व्यवसायात पाठवलं आहे. मला यावरून टोमणे मारणं त्यांच्यासाठी नेहमीचं झालं होतं. पण आता माझ्या मुलीनं यश मिळवल्यानंतर शेजारी माझ्या तब्येतीची विचारपूस करतात, मदतही करतात.’
घराला दिलं होतं ‘हडळीचं घर’ असं नाव :
अर्चनाच्या आईनं सांगितलं की, ‘माझे पती शिवराम यांचं 2008 मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं होतं. अशा परिस्थितीत कुटुंब कर्जबाजारी झालं होतं. 2017 मध्ये, माझा धाकटा मुलगा बुद्धिमानसिंग याचा सर्पदंशानं मृत्यू झाल्यानं मी मनाने खूपच खचले होते. या घटनेनंतर तर मला लोक हडळ म्हणू लागले. माझ्या घराला लोक हडळीचं घर म्हणायचे.’
दरम्यान, आता अंडर-19 भारतीय महिला क्रिकेट टीमनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या टीमची सदस्य असणाऱ्या अर्चनाची संघर्षमय कहाणी पुढे आली आहे. तिचा संघर्षमय प्रवास पाहून अनेकांनी तिच्या यशाचे कौतुक केलं आहे. तेव्हा या पुढेही अनेक मुली तिच्या आयुष्यातून प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करूया.