दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत पार पडतील. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरू होऊन 25 मार्च पर्यंत होईल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.मंडळाकडून असंही सांगण्यात आलं आहे की, संकेतस्थळावर असलेली वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेआधी शाळा, महाविद्यालयात छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावं. व्हॉटसअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांच्या परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना कळवण्यात येईल असंही बोर्डाने म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसच्या वतीने गृह मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनीही आपला अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे. काँग्रेस नेत्याच्या पत्रानंतर गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सर्व युनिट्सकडून अहवाल देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा, वाहतूक आणि विशेष शाखा इत्यादींकडून अहवाल मागवण्यात आला होता. वृत्तानुसार, राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी साध्या गणवेशात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले होते. त्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी सुरक्षेचा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, राहुल गांधी पोलिसांनी केलेली गराडा तोडताना दिसले. 24 डिसेंबर रोजी दिल्लीत भारत जोडो यात्रेचा मार्ग 23 किलोमीटरचा होता.यापूर्वी, सरकारी अधिकार्यांनी गुरुवारी सांगितले की, राहुल गांधींनी 2020 पासून 113 वेळा सुरक्षा प्रोटोकॉलचे ‘उल्लंघन’ केले असले तरी, दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘संपूर्ण’ सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. एक दिवसापूर्वी, काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीत ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान कथित सुरक्षा त्रुटींचा आरोप केला होता. काँग्रेसने बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा केला आणि यात्रेत सहभागी होणाऱ्या गांधी आणि इतरांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.”
मलाही तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला, फडणवीसांनी थेट अधिकाऱ्याचं नावचं घेतलं
मागील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतं. आमच्या अनेक आमदारांना त्यांनी त्रास दिला. मला देखील तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला. मात्र, आम्ही तसे वागणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशीही आरोपप्रत्यारोप पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात ठाकरे गटाने केलेल्या आरोपांवर उत्तरे दिली. तर अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत गृहविभागाविषयी माहिती दिली. यावेळी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनाही त्यांनी खोडून काढलं.मजूर म्हणून निवडून आलेले 25 आमदार होते. पण तरी देखील दरेकर आणि प्रसाद लाड यांना टार्गेट केले. मला देखील कसे जेलमध्ये टाकता येईल याचा प्लॅन ठरला. संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती. कसेही करून फडणवीस यांना अडकवा. कंगना राणावत हिचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. रवी राणा आणि नवनीत राणा यांना 13 दिवस जेलमध्ये टाकले. आमच्या मंत्र्यांवर आरोप लावता आणि राजीनामा मागता. तुमचे मंत्री जेलमध्ये गेले तरी राजीनामा घेतला नाही. आमच्या मंत्र्यामध्ये चूक असेल तर राजीनामा घेऊ. मुख्यमंत्री यांच्यावर आरोप करून तुम्ही तोंडावर पडलात.
गुजरात विजयानंतर आता मिशन कर्नाटक! ‘या’ दोन भागावंर असणार भाजपाचे विशेष लक्ष
नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीतील विजयामुळे भाजपाचे मनोबल वाढलेले आहे. असे असतानाच आता भाजपाला आगामी वर्षात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच योजना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंड्या येथे काँग्रेस आणि जेडीएस पक्षांवर टीका केली. शाह यांनी या सभेच्या माध्यमातून भाजपाच्या प्रचाराला सुरवात केल्याचे म्हटले जात आहे.अमित शाहा यांनी जनसंकल्प यात्रेच्या माध्यमातून मंड्या येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि जेडीएस पक्षावर टीका केली. शाह यांनी हे पक्ष जातीवादी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप केला. “मंड्या आणि म्हैसूर या भागातील लोकांनी काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांना यापूर्वी संधी दिलेली आहे. मात्र यावेळी या भागाने भाजपाला मते द्यावीत. आपण या दोन्ही पक्षांचे शासन अनुभवलेले आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा येथील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीमधील लोकांसाठी एटीएम म्हणून काम केले. तर जेडीएस सत्तेत असताना येथील नेत्यांनी एका परिवारासाठी एटीएम म्हणून काम केले,” अशी टीका अमित शाहा यांनी केली. गांधी परिवार आणि देवेगौडा परिवाराला लक्ष करण्याच्या उद्देशाने शाह यांनी वरील विधान केले.
ऋषभ पंतच्या अपघातानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट, म्हणाले “आपण व्यथित झालो आहोत….”
भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतच्या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियावरुन त्याचे चाहते काळजी व्यक्त करत असून लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूड, राजकीय, क्रीडासह सर्वच क्षेत्रातून ऋषभ पंतच्या अपघातावर प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत आपण व्यथित असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं असून “ऋषभ पंतच्या अपघातानंतर आपण व्यथित आहोत. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करत आहे”.ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला असून, देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंत दिल्ली येथून देहरादूनला जात असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली. पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे.
SD Social Media
9850 60 3590