सध्या बाजारपेठेत आवक होत असलेला कांदा हा साठवणूकीतला किंवा खरीप हंगामातलाच आहे. असे असतानाही देशातून कांदा निर्यात ही अत्यल्प प्रमाणात सुरु आहे. कारण लाल कांदा हा निर्याती योग्य नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या निर्यातीमध्ये 10 लाख 55 हजार टनाची घसरण झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत कांद्याची निर्यात 24 टक्क्यांनी घसरली आहे.
गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 6 लाख 72 हजार टनांवरून चालू आर्थिक वर्षात याच कालावधीत 4 लाख 34 हजार टनांवर आली आहे.2020-21 मध्ये (Maharashtra) राज्यातून किमान 8 लाख टन निर्यात झाली होती, तर 2019-20 मध्ये हा आकडा 7 लाख 29 हजार टन होता. देशातील कांद्याची लागवड करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश सर्वाधिक आहे.
शेतीमालाची निर्यात परकीय चलन मिळवून उत्पन्नात वाढ करण्यासाठी केली जाते. पण देशांतर्गत बाजारपेठेतच अधिकचा दर मिळत असेल तर कशाला निर्यात असा विचार शेतकरी करुन लागले आहेत. त्यामुळेच निर्यातीचे प्रमाण घटत असल्याचे नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे कार्यकारी संचालक पी.के.गुप्ता यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे दर 18 ते 22 रुपये किलोपर्यंत होते, तर देशांतर्गत बाजारात 20 ते 25 रुपये किलोच्या दरम्यान होते. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली नाही, मात्र कांद्याचा पुरवठाच होत नसल्याने निर्यातदारांची पळापळ सुरु आहे.
सध्या कांद्याची आवक सुरु असतनाही सरासरी एवढा दर मिळत आहे. कारण त्याच प्रमाणात मागणीही सुरु आहे. उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली की कांद्याचे दर कमी होतील असा अंदाज फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केले. सध्या लासलगाव ठोक बाजारात लाल कांद्याला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. भारतीय उन्हाळी कांदा पिकांचा हंगाम लवकरच सुरू होत असून तो तीन ते चार महिने चालू राहू शकतो. अशा वेळी निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे,’ असे ते म्हणाले.