थायलंडच्या पटाया इथं आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत राजस्थानच्या प्रिया सिंह हिने सुवर्णपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती राजस्थानची पहिली महिला बॉडी बिल्डर आहे. सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या प्रिया सिंहने यासाठी बराच संघर्ष केला आहे.
प्रिया सिंहने नुकत्याच झालेल्या थायलंडमधील स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून देशाचं नाव उंचावलं. पण राजस्थानमध्ये जेव्हा जयपूर विमानतळावर ती पोहोचली तेव्हा स्वागतासाठी फक्त घरचे लोक उपस्थित होते. जयपूरमध्ये पोहोचल्यानंतर लोकांचे प्रेम मिळेल अशी तिला अपेक्षा होती. मात्र तिचा विमानतळावर पोहोचताच भ्रमनिरास झाला.
राजस्थानच्या बिकानेरमध्ये प्रिया सिंह राहते. वयाच्या दहाव्या वर्षीच तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. पण सज्ञान होताच तिने कुटुंबासह समाजासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडली. सुरुवातीला कुटुंबियांकडून म्हणावा तसा पाठिंबाही मिळाला नाही पण अखेर तिच्या जिद्दीपुढे घरच्या लोकांनी नमतं घेत तिला साथ दिली.
कुटुंब आर्थिक अडचणीत असताना तिने प्रिया सिंहने जिममध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण घर आणि जिममधील नोकरी दोन्ही सांभाळणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. मात्र यामध्ये तिच्या पतीने तिला खूप मदत केली. प्रिया सिंहला दोन अपत्ये आहेत.
जिममध्ये नोकरीवेळी तिनेही ट्रेनिंग घेतलं. तसंच आपल्या कष्टाच्या जोरावर एक चांगली जिम ट्रेनरही बनली. जिममध्ये ट्रेनिंगवेळीच प्रिया सिंहला समजलं की बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असते. पण राजस्थानमध्ये महिला बॉडी बिल्डर नसल्याचं समजताच तिने यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने राज्य पातळीवर तीन वेळा सुवर्णपदक जिंकलं आहे.