ग्रामपंचायत निवडणुकीत आपने खातं उघडलं! थेट सरपंचपदी आपचा उमेदवार विजयी

दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने आता महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. भंडारा जिल्ह्यात आपचा उमेदवार निवडून आला आहे. लवकरच भारतीय निवडणूक आयोग आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देऊ शकेल. गुजरातमध्ये सुमारे 13 टक्के मतांची टक्केवारी आणि 5 आमदार जिंकून, आपने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात देखील आपने ग्रामपंचायतच्या माध्यमातून शिरकाव केला आहे.

राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये ताजी अपडेट्स येईपर्यंत भाजपने एकूण 1422 ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने 987 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर आम आदमी पक्षानेही महाराष्ट्रात खातं उघडलं आहे. भंडाऱ्यात आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा निवडणूक जिंकली आहे. पाथरी ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता विद्या गुरुदास कोहळे विजयी झाल्या आहेत.

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणार

पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 6.8 टक्के मते मिळवली आणि 2 जागा जिंकल्या. यानंतर आप गोव्यात मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष बनला आहे. आता गुजरातमध्येही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने कामगिरीच्या जोरावर प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवला आहे. अशा प्रकारे, 4 राज्यांमध्ये मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष बनून, AAP राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.