स्टार्टअप उद्योजकांसाठी गुड न्यूज, NRDC च्या विशेष सेंटरची पुण्यात स्थापना

देशभरातील  विशेषत: पुणे आणि महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे (एनआरडीसी) लोकसंपर्क (आऊटरिच) सेंटर पुण्यात सुरू होणार आहे. देशभरातील 5 हजारांपेक्षा जास्त उद्योजक, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेर्टसना यामुळे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे तरुणाईला अधिक पाठबळ मिळेल, असा विश्वास एनआरडीसी नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी यांनी व्यक्त केला आहे.

काय होणार फायदा?

रस्तोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्था, विद्यापीठ, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्माण होणा-या तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व हस्तांतरण करण्याचे कार्य एनआरडीसी करत आहे. केमिकल, अ‍ॅग्रो अ‍ँड फूड प्रोसेसिंग, लाईफ सायन्सेस, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स यासह विक्रीयोग्य औद्योगिक उत्पादने व सेवांमध्ये संशोधनास या संस्थेच्या माध्यमातून चालना देण्यात येते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आजवर सुमारे 4500 कोटी रुपयांची भर पडली आहे.

एनआरडीसीच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये लोकसंपर्क सेंटर स्थापन करण्यासाठी संपर्क साधला. त्यानुसार हे केंद्र सुरु होत आहे. या  सेंटरद्वारे पेटंट, डिझाइन, कॉपीराइट, ट्रेडमार्क इत्यादी दाखल करणे आणि देखभाल करणे, ही कामे होणार आहेत. त्याचबरोबर  प्रक्रिया, उत्पादन, उत्पादनासाठी उल्लंघन संरक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाशी संबंधित संपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येईल. या  क्षेत्रातील संशोधक, अकादमी, स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शेखर मुंदडा यांची या केंद्राच्या संचालकपदी निवड झाली आहे. ‘महाराष्ट्रात पहिल्यांदाच या प्रकारचे सेंटर सुरु करण्यात येत आहे. या सेंटरचा फायदा निश्चितपणे स्टार्टअप आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होईल. या सेंटरसोबत इथं एन्क्युबेशन सेंटर सुरू होणार असून त्याचा लाभ नवउद्योजकांना मिळेल,’ असे मुंदडा यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.