आज दि.३० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी, केंद्र सरकारनं दिला मोठा धक्का!

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात केंद्र सरकारनं आपली बाजू मांडून धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुलै 2022 नंतर परदेशात अर्धवट शिक्षण सोडून आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देता येणार नाही, असं सुनावणीवेळी केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. तर शुक्रवारी या प्रकरणात पुढील सुनावणी आहे. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

एक खेळाडु किती सहन करेल? सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने BCCIला सुनावलं

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाला संजू सॅमसनवरून जोरदार सुनावलं आहे. कनेरियाचे म्हणणे आहे की, भारतीय निवड समितीने संजू सॅमसनसारख्या खेळाडुला खूपच कमी संधी दिली, तर ऋषभ पंत खराब फॉर्ममध्ये असून त्याला सतत संधी दिली जात आहे.

कनेरियाने संजू सॅमसनची तुलना अंबाती रायडूशी केली. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये रायडूला भारताचा चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याच्या जागी संघात विजय शंकरला घेण्यात आलं होतं. अंबाती रायडूलासुद्धा ही बाब खटकली होती. दुसरीकडे विजय शंकर ना फलंदाजीत चमकला, ना गोलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला.

सोशल मिडियावर चोरांचा सुळसुळाट

सायबर गुन्हेगार नेहमीच नवनव्या क्लृप्त्या वापरून सोशल मीडिया, फेक कॉल, आणि अनोळखी लिंकच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करतात. त्यासाठी प्रत्येक वेळी ते नवनवे फंडे वापरत असतात. गुन्हेगारांच्या या भूलथापांना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटका देखील सहन करावा लागतो. अशा घटनांची संख्या नागपूर शहरात देखील बळावली आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून काही टिप्स देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकेल. 

हल्ली सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करू नये, अनोळखी लिंक ओपन करू नये, कार्ड डिटेल्स कुणालाही शेअर करू नये, तसेच खात्री केल्याशिवाय कोणाच्याही खात्यात पैसे पाठवू नये, या गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या तर संभाव्य आर्थिक फ्रॉड होणार नाही आणि बँकेतील पैसेही सुरक्षित राहण्यास मदत होते.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ब्रिझा कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्दैवाने तिन्ही मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाची शिफारस, केंद्र सरकारची मंजुरी, बीडचे सुपूत्राची न्यायमूर्तीपदापर्यंत झेप

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशपदासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन नावांची शिफारस केली होती. त्यातील दोन नावांना केंद्राच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यात बीडचे सुपूत्र अॕड. संतोष चपळगावकर तसेच अॕड. मिलिंद साठ्ये या दोघांचा समावेश झाला आहे. त्यांना 30 नोव्हेंबरला न्यायमूर्तिपदाची शपथ दिली जाईल.

आफताबच्या नार्को टेस्टची पोलिसांची तयारी पूर्ण

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची सोमवारी वैद्यकीय चाचणी होणार आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांची तिसरी बटालियन सोमवारी सकाळी साडेसात वाजता आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. तेथे त्याची वैद्यकीय चाचणी होईल. येथे डॉक्टर त्याच्या शरीराचे सर्व पॅरामीटर्स तपासतील. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून आफताबची नार्को चाचणी सुरू होणार आहे. सहसा ही चाचणी 2 ते 3 तासात पूर्ण होते. या प्रकरणात देखील इतकाच वेळ लागू शकतो. पण, काही पॅरामीटर्सला जास्त वेळही लागण्याची शक्यता आहे.

अनेक गुढ प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांना पूर्ण तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रश्नांमध्ये कट कसा आखला, मोबाइल डेटामध्ये काय आहे, मोबाइलमधून कोणते पुरावे हटवले गेले, दोघांमधील संबंध किती खोलवर होते, कोणती शस्त्रे वापरली गेली, शस्त्र फेकण्याचे ठिकाण, हेतू काय होता? हत्येमागे तारीख, खुनाचा पुरावा, त्याच्या अॕपचा तपशील, आफताबच्या नवीन मित्राची माहिती असे अनेक प्रश्न आहेत.

टोयोटाला ओळख देणारा उद्योजक हरपला, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

वाहन निर्मिती क्षेत्रात नावाजलेले दिग्गज आणि टोयोटा या नावाला भारतात ओळख निर्माण करून देणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ( ३० नोव्हेंबर ) मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटलं की, प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची मूळ मालकीण असलेल्या मुनीरा प्लम्बर हिने दिलेला जबाब आणि न्यायालयात सादर केलेले पुरावे परस्परविरोधी आहे. तरी तिचा जबाब पूर्णतः बाजूला ठेवता येणार नाही.

रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस

रशियामधील एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ असं म्हटलं आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा करोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.

ऋतुराज गायकवाडचा जलवा कायम; उपांत्य फेरीत झळकावले सलग दुसरे शतक

विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध आसाम संघात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आपली धावांची भूख कायम ठेवली आहे. त्याने या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातही चमकदार कामगिरी केली आहे. गायकवाडने आसामविरुद्ध शतक झळकावले आहे. ऋतुराज गायकवाडने १२६ चेंडूत १६८ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाने आसाम समोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात चेंडूत ७ षटकार मारून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.आजच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आसाम संघासमोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.