पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर ईडी आज मुंबई सत्र न्यायालयात आपलं उत्तर सादर करण्याची शक्यता आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.
राऊतांच्या जामीन याचिकेवर उत्तर सादर करण्याचे ईडीला आदेश
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राऊत यांनी विशेष न्यायालयात केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ स्पष्टेंबरपर्यंत वाढ
राऊत यांना सोमवारी (५ सप्टेंबर ) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर बुधवारी (७ स्पटेंबर) राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती.